Nitish Kumar Meets Sharad Pawar: नितीश कुमार यांनी घेतली शरद पवार यांची भेट, 2024 च्या लोकसभा निवडणुकीवर झाली चर्चा?
Nitish Kumar Meets Sharad Pawar: बिहारमध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन नवीन सरकार स्थापन केल्यापासून मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच सक्रिय झाले आहेत.
Nitish Kumar Meets Sharad Pawar: बिहारमध्ये भाजपला सोडचिठ्ठी देऊन नवीन सरकार स्थापन केल्यापासून मुख्यमंत्री नितीश कुमार चांगलेच सक्रिय झाले आहेत. ते चार दिवसीय दिल्ली दौऱ्यावर असून ते एकामागून एक विरोधी पक्ष नेत्यांची भेट घेत आहेत. अशातच आज त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली आहे. नितीश कुमार यांनी दिल्लीत पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये 2024 ची लोकसभा निवडणूक आणि विरोधी पक्ष नेत्यांना एकत्रित आणण्याबाबत चर्चा झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पवार यांची भेट घेण्यापूर्वी नितीश कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस दीपंकर भट्टाचार्य यांची भेट घेतली.
'मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नाही'
बिहारमध्ये आरजेडी सोबत सरकार स्थापन केल्यानंतर नितीश कुमार हे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होती. मात्र या चर्चला त्यांनीच पुर्नविरोम दिला आहे. नितीश कुमार हे मंगळवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले आहेत की, ते पंतप्रधानपदाचे उमेदवार नाही. तसेच ते यासाठी इच्छुकही नाही आहे. त्यांचं लक्ष हे भारतीय जनता पक्षविरोधात विरोधी पक्षांना एकत्रित आणणे आहे. तत्पूर्वी शरद पवार हे आगामी लोकसभा निवडणुकीत विरोध पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, अशी चर्चा होती. मात्र त्यांनीही पंतप्रधानपदाचे उमेदवार नसल्याचे स्पष्ट केलं होतं. तसेच ते विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असून यावर त्यांची चर्चा सुरु असल्याचं ते म्हणाले होते.
मुलायम सिंह यादव यांची घेतली भेट
मंगळवारी नितीश कुमार यांनी गुडगावमधील मेदांता रुग्णालयात समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांची भेट घेतली होती. यावेळी सपा प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही तेथे उपस्थित होते. मुलायम सिंह यादव यांना भेटण्यापूर्वी त्यांनी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांचीही भेट घेतली.
राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचीही घेतली भेट
आपल्या चार दिवसीय दिल्ली दौऱ्यात नितीश कुमार यांनी सोमवारी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भेट घेतली. तर मंगळवारी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेतली. केजरीवाल यांच्या आधी नितीश कुमार यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस सीताराम येचुरी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) सरचिटणीस डी. राजा यांची त्यांच्या पक्ष कार्यालयात भेट घेतली होती.