Nitin Gadkari, नागपूर : नागपूरात मेट्रो सह अनेक उड्डाणपूल बांधल्यानंतर आता गडकरींनी नागपुरात अत्याधुनिक आणि विमानासारखी सोय असलेल्या बस सेवेचे नवीन स्वप्न पाहिले आहे. नागपूरच्या अगदी जवळ वसलेल्या वाडी सह संपूर्ण रिंग रोड वर 50 किमी अंतरापर्यंत विशेष इलेक्ट्रिक बस सुरू केली जाणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांन जाहीर केले. ते नागपुरातील वाडी येथील नव्या उड्डाणपुल व सिमेंट रस्त्याच्या लोकार्पण सोहळ्या प्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी वाडी येथील उड्डाणपुलाचे काम चांगले झाल्याचे सांगत यासाठी काम करणाऱ्या अधिकारी आणि कॉन्टॅक्टरचे अभिनंदन केले. वाडी येथील उड्डाणपुलाच्या कामात बोट ठेवायला जागा मिळाली नाही, इतकं चांगलं जाम झाल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
वातानुकूलित बसमध्ये एक्झिक्यूटिव्ह खुर्च्या आवश्यकतेनुसार लॅपटॉपची सोय
नितीन गडकरी म्हणाले, विमानासारख्याच अत्याधुनिक सोयींनी युक्त बस ही स्कोडा आणि टाटा कंपनीचा संयुक्त उपक्रम असून त्याला अत्यंत कमी कालावधीत चार्ज करण्यासाठीचे तंत्रज्ञान जपानच्या हिटाची कंपनीने विकसित केले आहे. वातानुकूलित बसमध्ये एक्झिक्यूटिव्ह खुर्च्या आवश्यकतेनुसार लॅपटॉपची सोय, खाण्यापिण्यासाठीचे पदार्थ उपलब्ध राहणार आहेत. नागपूरच्या अवतीभवती पसरलेल्या रिंग रोडवर पन्नास किलोमीटर अंतरापर्यंत पहिल्यांदा ही बस सुरू केली जाणार असून त्या माध्यमातून नागपूरच्या अवतीभवतीच्या उपनगरात राहणाऱ्या लोकांना नागपूर शहरात येणे सोयीस्कर होणार आहे.
काम न करणाऱ्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरला रगडल्या शिवाय राहत नाही
पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, वाईट काम करणारे अनेक अधिकारी सस्पेंड करायचे आहेत तर कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्ट करायचे आहेत. कारण कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरकडून मी मालपाणी खात नाही. काम न करणाऱ्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टरला रगडल्या शिवाय राहत नाही, अशा शब्दात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काम न करणाऱ्या अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर्सला तंबी दिली आहे.
नागपुरात नेशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे. नागपूर जवळच्या वाडीमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज संध्याकाळी एनएचएआयने तयार केलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण केले. या पार्श्वभूमीवर नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पसपासून वाडीच्या उड्डाणपूलापर्यंत सुमारे अडीच किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचेही लोकार्पण पार पडले. यानिमित्ताने अधिकाऱ्यांनी सिमेंट रस्त्याच्या दुभाजकावर लावलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबावर तिरंग्याच्या रंगाने विद्युत रोषणाई केली होती. मात्र, बेजबाबदार अधिकाऱ्यांनी विद्युत रोषणाईमध्ये तीन रंगांचा क्रम राष्ट्रीय ध्वजामधील रंगाच्या क्रमाच्या अगदी विपरीत लावला.. त्यामुळे विद्युत रोषणाईच्या माध्यमातून दिसणारा राष्ट्रीय ध्वज नेमका उलटा दिसत होता. त्यात हिरवा रंग सर्वात वर तर केशरी रंग सर्वात खाली दिसत होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या