Solapur News: राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) भाजपला एकापाठोपाठ एक धक्के देत असताना आता अजून मोहरे पक्षापासून दूर जावू नयेत, म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) दोन दिवस सोलापूर जिल्ह्याचा दौरा होत आहे . हा दौरा भाजपसाठी अत्यंत महत्वाचा असून भाजप समोरील आव्हाने देवेंद्र फडणवीस कसे पेलणार, हे यावेळी दिसून येणार आहे. सोमवारी दुपारी 3 वाजता पंढरपूर, मंगळवेढा येथून दौऱ्याची सुरुवात होत असून मतदारसंघासाठी महत्वाच्या असणाऱ्या उपसा सिंचन योजनेचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.


या उपसा सिंचन योजनेमुळे मंगळवेढ्यातील कायम दुष्काळी 35 गावांचा पिण्याचा आणि शेतीचा प्रश्न सुटणार आहे. याशिवाय पंढरपूर एमआयडीसी चे भूमिपूजन देखील फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच तामदर्डी येथील बंधाऱ्याचे भूमिपूजन देखील फडणवीस करणार आहे. याशिवाय अजून या मतदारसंघातील अनेक योजनांची भूमिपूजन  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहेत. यानंतर फडणवीस यांच्या उपस्थितीत आंधळगाव येथे शेतकरी मेळावा होणार आहे. यानंतर फडणवीस हे अक्कलकोट येथील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी अक्कलकोट येथे जाणार आहेत.


फडणवीसांच्या दौऱ्यात प्रशांत परिचारक उपस्थित राहणार का?


पंढरपूर मंगळवेढा आणि अक्कलकोट हे दोन्ही मतदार संघ सध्या भाजपच्या ताब्यात आहेत. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात विद्यमान आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यात उमेदवारीसाठी जोरदार स्पर्धा सुरू असून परिचारक या वेळेला बंडखोरी करून तुतारी हातात घेण्याची शक्यता आहे.   त्यामुळे फडणवीसांच्या दौऱ्यात परिचारक उपस्थित राहणार का? त्यांचे समाधान देवेंद्र फडणवीस करणार का? अशा अनेक गोष्टी सोमवारी पाहायला मिळणार आहे त्या तुलनेने अक्कलकोट येथील आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची परिस्थिती चांगली आहे. सोलापूर जिल्हा हा भाजपचा गड बनला होता. सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद, जिल्ह्यातील दोन्ही खासदार हे भाजपचे होते. मात्र, अलीकडच्या काळात लोकसभा निवडणुकीपासून मोहिते पाटील यांनी साथ सोडल्यानंतर हा गड ढासळू लागला आहे . यातच मनोज जरांगे पाटील यांनी फडणवीस आणि भाजपला लक्ष्य बनवल्यानंतर माढा आणि  सोलापूर या दोन्ही लोकसभेच्या जागा भाजपला गमवाव्या लागल्या होत्या. 


माढ्याबरोबर करमाळ्यातही महायुतीला दणका?


भाजपने विधानपरिषद दिलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे पर्वत उघडपणे शरद पवार यांच्या स्टेजवर जाऊन त्यांनी भाषण करीत जिल्ह्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहे, असे संकेत दिल्याने रणजीत सिंह ही लवकरच तुतारी हातात घेणार असे चित्र आहे. आता एकेक चिरे ढासळू लागल्याने हा गड शाबूत  ठेवण्यासाठी पुन्हा एकदा फडणवीस हे सोलापूरच्या मैदानात उतरत आहेत. त्यामुळेच सोमवारी फडणवीसांचा मंगळवेढा आणि अक्कलकोटचा दौरा होत असून  यामध्ये सोलापुरातील दक्षिण सोलापूर, शहर उत्तर, अक्कलकोट आणि शहरामध्ये या चार मतदारसंघाबरोबर पंढरपूर मंगळवेढा, माळशिरस आणि बार्शी या मतदारसंघाबाबत फडणवीस आढावा घेणार आहेत. अजितदादांच्या सोबत असणारे बबन दादा यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यामुळे माढ्याबरोबर करमाळ्यातही महायुतीला दणका बसणार आहे. त्याचबरोबर माळशिरस , पंढरपूर मंगळवेढा आणि दक्षिण सोलापूर या मतदारसंघात देखील अडचणी वाढलेले आहेत.


दोन दिवस संपूर्ण जिल्ह्याचा आढावा 


माळशिरस येथे मोहिते पाटलांच्या जाण्याने राम सातपुते यांना कसे निवडून आणायचे हा पक्षासमोरचा प्रश्न असून पंढरपूर मंगळवेढ्यात परिचारकांचे समाधान केल्याशिवाय अवताडे यांचा विजय धूसर बनू शकतो. अशावेळी फडणवीस यांना सोलापूर जिल्ह्याचा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात ठेवण्यासाठी आणि शरद पवारांच्या व्ह्यूहरचनेला उत्तर देण्यासाठी चांगलीच तयारी करावी लागणार आहे. देवेंद्र फडणवीस हे सात ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा मंगळवेढ्यात येणार असून तिथून अक्कलकोट येथे कार्यक्रम करणार आहेत. या दिवशी त्यांचा मुक्काम सोलापुरातच असून या मुक्कामाच्या वेळी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा फडणवीस घेतील. दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या लाडकी बहीण कार्यक्रमास फडणवीस हजेरी लावणार असून यावेळी सोलापूर जिल्ह्यातील जागांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चाही होऊ शकणार आहे.


हे ही वाचा