Ladki Bahin Yojana, मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या अकाऊंटमध्ये तर आले पण त्यांना काढता येत नव्हते. घाटकोपरच्या आरबीएल बँकेत अशी शेकडो प्रकरणे समोर आल्यावर आज (दि.5) भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासह अनेक महिलांनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. बँक परस्पर पैसे कापत आहे. केव्हायसी नसल्याचे कारण दिले जात असून महिलांच्या हक्काचे पैसे मिळत नसल्याची तक्रार महिलांनी पोलीस अधिकारी आणि सोमय्या यांच्याकडे केली. यावर आठवडाभराची वेळ सोमय्या यांनी बँकांना दिली आहे. सर्व महिलांना हक्काचे पैसे न मिळाल्यास अश्या बँकांवर कारवाई करण्यात येईल अशी प्रतिक्रिया सोमय्या यांनी दिली आहे.
लाडकी बहीण योजना काय आहे?
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण" योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने 28 जून 2024 रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. 1,500/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी कोण पात्र?
1. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
2. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
3. किमान वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत.
4. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
5. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसावे.
एक कोटी भगिनींना लखपती बनविणार : देवेंद्र फडणवीस
आर्थिक विकासाच्या प्रवाहात महिलांना आणण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखपती दिदीसारख्या अनेक योजना सुरू केल्या. राज्यातही 1 कोटी भगिनींना लखपती बनविण्याचा आमचा निर्धार आहे. राज्यात भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, एसटी प्रवास सवलत, मोफत शिक्षण अशा योजनांबरोबरच लाडक्या भावांसाठीही युवा कार्य प्रशिक्षण योजना, शेतक-यांना मोफत वीज, पीक विमा, सोलर वीज अशा विविध योजना सुरू केल्या आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत राज्य शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक भगिनींना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले आहे. बँक खात्यात आलेल्या रकमेतून मुलांचा शैक्षणिक खर्च, घरखर्च, ज्येष्ठांचा औषधोपचार आदी बाबींबरोबरच महत्वाच्या व तातडीच्या गरजा भागविल्या जात आहेत. ही योजना आमच्यासाठी मोठा आधार असल्याची भावना मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत वचनपूर्ती सोहळ्यात आलेल्या बहिणींनी व्यक्त केली होती.