Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला
Rahul Gandhi:राहुल गांधी यांनी पुण्यातील छात्रों की गुंज कार्यक्रमात विद्यार्थिंनीसोबत संवाद साधला. यावेळी आदिवासी विद्यार्थिनीनं त्यांच्या समस्या मांडल्या.

पुणे : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी छात्रों की गुंजच्या (Chhatron Ki Goonj) पुण्यातील कार्यक्रमात तरुणाईला संबोधित केलं. राहुल गांधी यांच्यासमोर निशा नावाच्या विद्यार्थिनीनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या. आदिवासी विद्यार्थ्यांचं मांजरीत उपोषण सुरु असल्याचं निशानं सांगितलं. यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचं निवेदन तिनं राहुल गांधी यांच्याकडे सोपवलं. माझी गोष्ट ही फक्त एका निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची आणि महाराष्ट्राची असल्यानं मराठीत मांडते, असं निशानं म्हटलं.
आम्ही जे उपोषणासाठी बसलोय, आमचे भाऊ आणि दोन बहिणी देखील बसल्या आहेत, त्यापैकी एका बहिणीची तब्येत नाजूक झालीय, तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आहे. आमचे प्रतिनिधी मंत्रालयात गेले तेव्हा, आमचे आदिवासी विकास विभागाचे मंत्री सॉरी मी याच्यावर काही करु शकत नाही हे मुख्यमंत्र्यांच्या हातात असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र,तुम्ही जर आदिवासी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी बसला असाल आणि तुम्ही जर आमचा विकास करु शकत नाही, तर तुम्हाला तिथं बसण्याचा अधिकार नाही, असं ठणकावून सांगत असल्याचं निशानं म्हटलं.
आदिवासी शाळांमध्ये सेंट्रल किचन सुरु केलं आहे. एका ठिकाणी जेवण बनतं आणि 70 ते 80 किमी लांब घेऊन जाणार यामुळं जेवण खराब होतं, त्यामुळं विषबाधा होते, असं निशानं म्हटलं. आदिवासी आश्रमशाळांमध्ये बेडची सुविधा नाही, पिण्याचं पाणी नाही, त्यामुळं गडचिरोलीत मण्यार सापानं दंश केल्यानं तिघांचा मृत्यू झाला आहे, तिघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, सरकारनं विद्यार्थ्यांच्या पालकांना किमान एक कोटींची मदत करावी, असं निशा म्हणाली.
आदिवासी वसतिगृह आहेत, ती पुण्यातील मध्यवर्ती भागात नाहीयेत, ती मांजरी आणि कोंढवा भागात आहेत, त्यामुळं शिकायला वेळ मिळत नाही. प्रवासात चार तासांचा वेळ जातो, असं निशानं म्हटलं. या सगळ्या मागण्या घेऊन मागील दहा दिवसांपासून उपोषणासाठी बसलोय. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी निवेदन दिलं आहे त्याचा विचार करुन काही तरी करावं, असं निशानं म्हटलं. आदिवासी विद्यार्थ्यांची वसतिगृह आहेत, त्यामध्ये गडचिरोलीचे विद्यार्थी असतात ते दिवाळीला जातात. एका महिन्यानंतर परत आल्यानंतर प्रेगनन्सी टेस्ट केली जाते, असं निशानं म्हटलं.
राहुल गांधी यांनी आंदोलन स्थळी का बोलवत नाही असं विचारलं असता निशानं त्यांना आमंत्रण दिलं. यावर राहुल गांधी यांनी निशाला मी तिथे येतो, यामुळं दबाव वाढेल, असं म्हटलं. आंदोलन स्थळी मला बोलवा, मी येईन, असं राहुल गांधी म्हणाले.
महिला भारताची ताकद
पुण्यातील स्वागतासाठी राहुल गांधी यांनी आभार मानले. राहुल गांधी यांनी भारतातील महिला या देशाचं सर्वात मोठं सामर्थ असल्याचं म्हटलं. भारतात महिलांच्या नावावर स्वतंत्रपणे 8 टक्के मालमत्ता असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. भारतातील 70 कोटी महिलांची स्वप्न, त्यांचा प्रवास हे आपल्या देशाचं वैभव आहे, असंही त्यांनी म्हटलं. या कार्यक्रमात विद्यार्थिंनींनी त्यांची मतं देखील मांडली.
Before You Go
Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!






















