Nilesh Lanke : पंतप्रधान मोदींची नगरमध्ये सभा होणार, इथेच माझा विजय फिक्स; निलेश लंकेंचा मिश्किल टोला
Shirdi Lok Sabha Election 2024 : अहमदनगरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होतेय, , असा खोचक टोला देखील निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लगावला आहे.
शिर्डी : माझ्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत, इथेच माझा विजय झाला असून माझा गुलाल फिक्स आहे, असा खोचक टोला देखील निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी लगावला आहे. अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात गुंडाराज वाढला असून या निवणुकीत जनताच हा गुंडाराज संपवेल अशी, टीका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी निलेश लंके यांच्यावर केली होती. आता विखे पाटलांच्या या टिकेला निलेश लंके यांच्यासह राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
पंतप्रधान मोदींच्या सभेवरून निलेश लंकेचा मिश्किल टोला
निलेश लंके यांनी विखे पाटलांच्या गुंडाराज टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटलं की, गुंडाराज कुणाचे हे सर्व जनतेला माहिती आहे. राहात्यात (विखेंचा मतदारसंघ) जाऊन पाहा गुंडाराज. कार्यकर्त्यांनी व्हॉटस्अप स्टेटस ठेवला तरी मारहाण केली जाते. माझ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक गुन्हा दाखल. गुंडाराज यांचाच असून पोलिस प्रशासनाचा वापर केला जातो, त्यामुळे जनता यांनाच दाखवून देईल, असा इशाराही निलेश लंकेंनी दिला आहे.
पंतप्रधान इथे येणार, यातच माझा गुलाल फिक्स
अहमदनगरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा होतेय, इथेच माझा विजय झाला. माझ्यासारख्या सर्वसामान्याच्या विरोधात देशाचे पंतप्रधान आणि अनेक नेते येत आहेत, त्यामुळे माझा गुलाल फिक्स आहे. आपण प्रधानमंत्र्यांना टीव्हीवरच बघत होतो, आता ते माझ्या विरोधात येतायत, यावरूनच कळतंय आपली किती ताकद वाढलीय, असा मिश्किल टोला लंकेंनी लगावला आहे.
प्राजक्त तनपुरेंची विखे पाटलांवर जहरी टीका
आमदार प्राजक्त तनपुरे यांनीही गुंडाराज मुद्द्यावर विखे पाटलांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. प्राजक्त तनपुरे म्हणाले, विखे पाटलांना गुंडांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या आजूबाजूला, कडेवर गुंडच असतात. राहुरी मतदारसंघाच्या माजी आमदारावर इतके गुन्हे आहेत की, ते तडीपार व्हायला पाहिजे. अहमदनगर शहरातले नावाजलेले गुंड यांच्याच मंचावर असतात. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं असतात याचे आत्मपरिक्षण करा. अहमदनगर शहरात गुंड सर्वसामान्य लोकांच्या जमिनीचे ताबे घेत आहेत. तुमच्या राज्यात काय चाललंय ते बघा, तुमचं राज्य थोड्याच दिवसाचं आहे, असंही तनपुरेंनी म्हटलं आहे.