Lok Sabha Election Result 2024: सांगली : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं (Nationalist Congress Party - Sharad Pawar) आपली स्वतःचीच पाठ थोपटल्याचं पाहायला मिळालं. पक्षाकडून जयंत पाटील (Jayant Patil) यांचा 'विजयाचा सेनापती' असा उल्लेख करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटलांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे.
काँग्रेसच्या लोकसभेमधील यशाचं सर्वत्र कौतुक होत असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनंही लोकसभेतील यशावरून स्वतःची पाठ घेतली थोपटून घेतली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विजयाचा सेनापती म्हणून नामोल्लेख करण्यात आला आहे. 80 टक्के स्ट्राईक रेट असाही उल्लेख जाहिरातीत करण्यात आला आहे.
जयंत पाटलांचा 'विजयाचा सेनापती' असा उल्लेख
लोकसभा निवडणूक निकालांमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनं 10 जागांवर निवडणूक लढवली आहे. त्यापैकी 8 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे 80 टक्के स्ट्राईक रेट, असा उल्लेख जाहीरातीत करण्यात आला आहे. तसेच, नवनिर्वाचित खासदारांच्या हार्दिक अभिनंदनाच्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वर्धापन दिनाच्या जाहिरातीत जयंत पाटील यांचा विजयाचा सेनापती म्हणून नामोल्लेख करण्यात आला आहे. शरदचंद्र पवार यांच्या सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून स्थानिक वृत्तपत्रात याबाबत जाहीरात देण्यात आली आहे. तसेच, सांगली शहरात ठिकठिकाणी फ्लेक्स देखील लावण्यात आले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष फुटी नंतर दोन्ही पक्ष एकाच दिवशी आपला वर्धापन दिन साजरा करणार आहेत. राष्ट्रवादी अजित पवार पक्ष मुंबईत वर्धापनदिन साजरा करणार आहे तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहे.
अहमदनगरमध्ये वर्धापन दिनाचा सोहळा
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा 25 वा वर्धापनदिन अहमदनगरच्या न्यु आर्ट्स महाविद्यालयाच्या प्रांगणात साजरा होणार आहे. राष्ट्रवादीच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि सर्व नवनिर्वाचित खासदार, आमदार माजी आमदारांची उपस्थिती राहणार आहेत. त्या अनुषंगाने अहमदनगरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे.