Yavatmal Political Updates: यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते मनोहर नाईक (Manohar Naik) यांच्या घरात उभी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. मनोहर नाईकांचे सुपुत्र ययाती नाईक विधानसभा लढणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुसद विधानसभेच्या रिंगणात विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या बंगल्यात उभी फूट पाहायला मिळत आहे. मनोहर नाईकांचे दोन्ही पुत्र येत्या विधानसभेत आमने-सामने भिडणार असल्याचं चित्र दिसून येत आहे. आपण आगामी विधानसभेची निवडणूक लढणार असल्याचं ययाती नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलं आहे. त्यामुळे येत्या पुसद विधानसभेत विद्यमान आमदार इंद्रनील नाईक आणि ययाती नाईक दोन्ही नाईक पुत्र आमने-सामने भिडणार, असं चित्र आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून ययाती नाईक निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आपल्यासाठी अनेक पर्याय असून अनेक विधानसभांमधून लढण्याचा मानस आपण उराशी बाळगला आहे, असं मत ययाती नाईक यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केलं आहे. अजित पवार यांच्यासोबत जात असताना मला कुठलीही विचारणा करण्यात आली नाही. तसेच, मोहिनी नाईक यांचं नाव लोकसभेसाठी आलं असता चर्चाही केली नाही, अशी खंतही ययाती नाईक यांनी व्यक्त केली आहे. तसेच, लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली नसल्याचंही ययाती नाईक यांनी यावेळी बोलताना सांगितलं. आपण शरद पवार गटात असून आगामी विधानसभेकरता दावेदारी केली आहे, असंही ते म्हणाले. 


नेमकं काय म्हणाले ययाती नाईक? 


ययाती नाईक यांनी बोलताना सांगितलं की, "शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष स्थापन होत असताना सुधाकरराव नाईक तिथे सोबत होते. त्याचबरोबर आमचं संपूर्ण कुटुंब शरद पवार यांच्यासोबत होता. पण त्यानंतर अजित पवार यांनी एक छोटा गट स्थापन करत भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यात इंद्रनिल त्यांच्यासोबत गेले. ते मला न विचारता गेले. मला खंत आहे की, त्यांनी दोन मिनिटं बोलून विचारलं असतं की, आपण काय निर्णय घ्यायचा, तर कदाचित हे चित्र दिसलं नसतं. याबाबतची नाराजी आहे." 


"मी गेल्या 20 वर्षांपासून काम करत आहे. या 20 वर्षांमध्ये माझ्यावर कुठली जबाबदारी दिली असती तर ती मी व्यवस्थित पार पाडली असती. दुसरा विषय लोकसभा निवडणुकीत मोहिनी नाईक यांचं नाव समोर आलं. त्यावेळी सुद्धा मला विचारण्यात आलं नाही. कुणीतरी मला विचारलं असतं की, यांचं नाव आपण पुढे करायला पाहिजे का? तिकीट मागायला जायला पाहिजे का? तर मी सुद्धा त्यांना होकार दिला असता. त्यांच्या पाठिशी उभं राहिलो असतो. पण तिथेसुद्धा मला डावलण्याचं काम झालं.", अशी नाराजी ययाती नाईक यांनी मांडली.