Narendra Modi 3.0 Maharashtra Ministers : नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून आज तिसऱ्यांदा शपथ घेतली. मोदींशिवाय एनडीएमधील 72 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या मात्र घटली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला केवळ 2 कॅबिनेट मंत्रिपद आणि 4 राज्यमंत्रिपद आले आहेत. कॅबिनेट मंत्रिपद मिळवणारे दोन्ही नेते भाजपचे आहेत. तर राज्यमंत्रिपदांमध्ये दोन भाजपच्या वाट्याला आले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला एक राज्यमंत्रिपद आलंय, तर एक राज्यमंत्रिपद रामदास आठवलेंच्या वाट्याला गेलं आहे.
महाराष्ट्रातून कोणाला मिळाले कॅबिनेट मंत्रिपद ?
महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.
महाराष्ट्रात कोणाला मिळाले राज्यमंत्रिपद?
महाराष्ट्राच्या वाट्याला यंदा 4 राज्यमंत्रिपद आली आहेत. भाजप खासदार रक्षा खडसे आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या गळ्यात राज्यमंत्रिपदाची माळ पडली आहे. मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर यांना पराभूत करत खासदार झाले. तर रक्षा खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीराम पाटील यांचा पराभव केला होता. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनाही राज्यमंत्रिपद मिळवले आहे.
कॅबिनेट मंत्री - नितीन गडकरी, पियुष गोयल
राज्यमंत्रिपद - रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे, प्रतापराव जाधव
इतर महत्वाच्या बातम्या
Modi Cabinet : मोदी कॅबिनेट 3.0 मध्ये 72 मंत्री! भाजपचे सर्वाधिक 60 मंत्री; शिवसेना, RPIला एक-एक राज्यमंत्रीपद