Eknath Khadse Joins BJP : एकनाथ खडसेंच्या भाजपप्रवेशाची इनसाईड स्टोरी, गेल्या तीन महिन्यांत काय-काय घडलं?
शरद पवार यांना ऐन निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील एकनाथ खडसे हे लवकरच भाजपत प्रवेश करणार आहेत. तशी माहिती खुद्द खडसे यांनीच दिलीय.
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यातील बडे नेते आपल्या सोईच्या पक्षात प्रवेश करत आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासारख्या दिग्गज नेत्यानेदेखील भविष्यकालीन राजकीय सोय लक्षात घेऊन भाजपत (BJP) प्रवेश केला आहे. त्यानंतर आता सध्या शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादीत (NCP) असलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) हेदेखील भाजपत प्रवेश करणार आहेत. खुद्द खडसे यांनी तशी माहिती दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून खडसे भाजपत जाणार असे सांगितले जात होते. पडद्यामागे तशा हालचालीदेखील होत होत्या.
सुरुवातीला पवार तिकीट देणार अशी चर्चा
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. भाजपने या जागेवर रक्षा खडसे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांना तिकीट मिळाल्यास रावेरमध्ये सून विरुद्ध सासरे अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशी चर्चा चालू असतानाच खडसे यांच्या गोटात मात्र वेगळ्याच हालचाली होत होत्या.
फेब्रुवारी महिन्यापासून भाजप प्रवेशाची चर्चा
एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा फेब्रुवारी महिन्यापासून चालू होती. यावर सर्वप्रथम त्यांचे राजकीय विरोधक तथा भाजपचे नेते गिरीश महाजन यांनीच विधान केले होते. खडसे हे भाजपात येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असं महाजन म्हणाले होते. खडसे भाजपत येण्यासाठी जोर लावत आहेत. मात्र त्यांना पक्षात घ्यायचे की नाही, याबाबत मला अजूनतरी कोणी विचारलेले नाही, असे महाजन यांनी स्पष्टपणे सांगितले होते.
खडसेंना लक्ष्य करण्याचा महाजनांचा प्रयत्न
एकनाथ खडसे हे भाजपच्या दिल्ली नेतृत्त्वाशी बातचित करत असताना दुसरीकडे त्यांच्या भाजप प्रवेशाचे वृत्त संपूर्ण महाराष्ट्रात पसरले होते. त्यानंतर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची कोठेही वाच्यता नाही. त्यामुळे नेमकं काय आहे, ते समोर येऊ द्या. माध्यमांच्या मार्फतच खडसे भाजपत प्रवेश करणार असे सांगितले जात आहे. खडसे भाजपत आल्यावर त्यांचे कोणी कसे स्वागत करायचे हे ठरवू, असे महाजन म्हणाले होते. तर भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांनीदेखील वेट अँड वॉचची भूमिका घेतली होती.
सुरुवातीला भाजप प्रवेशाचे वृत्त नाकारले
एकनाथ खडसे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रातील भाजपच्या नेत्यांची भेट घेतली होती, असे वृत्त 3 एप्रिल रोजी समोर आले होते. मात्र हे वृत्त खडसे यांनी फेटाळले होते. दिल्लीमध्ये गेल्यावर अनेकांशी भेटीगाठी होतात, मात्र मी दिल्लीला गेलेलो असताना यावेळी कोणाचीही भेट झालेली नाही, असे खडसे म्हणाले होते. तसेच भाजपत जायचे असेल तर मला प्रयत्न करण्याची गरज नाही. माझे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चांगले संबंध आहेत, असे म्हणत भाजपप्रवेशाचे वृत्त त्यांनी फेटाळले होते.
भाजपच्या प्रवक्त्यांनी केले होते सूचक विधान
एकनाथ खडसे यांनी भाजप प्रवेशाचे वृत्त फेटाळले असले तरी महाजन यांच्यानंतर भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनीही खडसे दिल्लीत जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेत आहेत, असं 4 एप्रिल रोजी सांगितलं होतं. खडसे यांना भाजपत घ्यायचे की नाही हा वरिष्ठांचा निर्णय असेल. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असे तेव्हा चव्हाण म्हणाले होते. चव्हाण यांच्या या दाव्याने खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला अधिक बळ मिळू लागले.
होय मी भाजपत जातोय, खुद्द खडसे यांनीच सांगितलं
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून भाजपत पुन्हा जाण्यासाठी खडसे प्रयत्न करत होते. त्यासाठी पडद्यामागे बऱ्याच हालचाली होत होत्या. खडसे यांनी सुरुवातीला हे वृत्त स्पष्टपणे नाकारले होते. मात्र आता खुद्द त्यांनीच मी भाजपत जातोय अशी माहिती दिली आहे. आज म्हणजेच 6 एप्रिल रोजी त्यांच्या भाजप प्रवेशाची तारीख निश्चित होणार आहे. ते भाजपत जाणार हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र भाजप प्रवेशानंतर त्यांना काय जबाबदारी मिळणार, हे अद्याप स्षष्ट झालेले नाही. खडसे यांची भाजपत आगामी काळातील भूमिका काय असेल, हे अद्याप गुलदस्त्यातच आहेत.