Satara : उदयनराजेंना भाजपची उमेदवारी जाहीर होताच आमदाराने अजितदादांना स्पष्टच सांगितलं; म्हणाला, अनेकदा सांगूनही तुम्ही ...
Satara Lok Sabha Election : माढ्यातही कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय, खोटे गुन्हे नोंदवले जातात, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याची तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली.
सातारा : पुण्यापेक्षाही साताऱ्याने राष्ट्रवादीला भरभरून दिलंय, प्रेम केलंय, पण त्याच साताऱ्यात आज घड्याळ्याच्या चिन्हावर उमेदवार नसावा हे चुकीचं आहे, उमेदवार कोणताही द्या, पण घड्याळ चिन्हावर द्या अशी मागणी वाईचे आमदार मकरंद पाटील (Makarand Patil) यांनी अजित पवारांकडे (Ajit Pawar) केलीय. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात घड्याळावर एकही उमेदवार नाही अशी खदखदही त्यांनी बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Satara Lok Sabha Election) अजित पवारांनी सातारा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांनी अजित पवारांकडे तक्रार केली.
दादा, कार्यकर्त्यांची भावना समजावून घ्या
मकरंद पाटील म्हणाले की, सातारा लोकसभा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. पुण्यापेक्षा सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी काँग्रेसला भरभरून प्रेम दिलंय. यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा जिल्हा आहे. माढा लोकसभेतही कार्यकर्त्यांना मानसिक त्रास दिला गेलाय. खोट्या गुन्ह्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. त्यामुळं अजितदादा, तुम्ही कार्यकर्त्यांची भावना समजून घ्या. आम्ही अनेकदा तुम्हाला सांगितलं आहे, तुम्ही वरिष्ठांनी आमचं ऐकलं नाही. याचे पडसाद तुम्ही पाहिले. कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात घड्याळावर एकही उमेदवार नाही. ज्या साताऱ्याने पक्ष रुजवला, वाढवला, त्या साताऱ्याचा उमेदवार घड्याळाचा असावा. उमेदवार कोणताही द्या इतकीच मागणी मी करतो.
उदयनराजेंच्या उमेदवारीवर राष्ट्रवादीचे पदाधिकारी नाराज?
साताऱ्याची जागेवर अजित पवारांनी दावा केला असताना ही जागा भाजपच्या वाट्याला गेल्याने जिल्ह्यातील नेत्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचं दिसून येतंय. त्यातच माढ्यामधून रणजित निंबाळकरांना भाजपने तिकीट दिल्याने राष्ट्रवादीतील पदाधिकारी आणखीनच नाराज असल्याचं चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी साताऱ्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीत आमदार मकरंद पाटलांनी आपली खदखद बोलून दाखवली.
साताऱ्यातील वाईचे आमदार मकरंद पाटलांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटाला जवळ केलं. सातारा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याने ती लोकसभेची जागा अजित पवार गटाला मिळेल असं चित्र होतं. पण भाजपच्या चिन्हावर लढण्यास ठाम असलेल्या उदयनराजेंनी दिल्लीमध्ये चार दिवस तल ठोकला आणि ती जागा पदरात पाडून घेतली. साताऱ्याच्या बदल्यात राष्ट्रवादीला नाशिकची जागा दिल्याची माहिती समोर येत आहे.
या आधी माढ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार करण्याची मानसिकता नसल्याचं अजित पवारांसमोर सांगितलं होतं.
ही बातमी वाचा: