Ujjwal Nikam: नरेंद्र मोदींचा फोन आला अन् विचारलं मी हिंदीत बोलू की मराठीत...; उज्ज्वल निकम यांनी राज्यसभेवरील निवडीनंतर सांगितला कालचा किस्सा
Ujjwal Nikam: साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना संसदेच्या उच्च सभागृहात स्थान देण्याचा यामागचा उद्देश आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि 26/11 मुंबई हल्ल्यातील अजमल कसाबला फाशीच्या शिक्षेपर्यंत न्यायालयात सिद्ध करणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नामांकित सदस्य म्हणून निवड केली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा आज (रविवारी,ता 13) केंद्र सरकारच्या अधिसूचनेद्वारे करण्यात आली. हर्षवर्धन श्रृंगला हे 1984 च्या बॅचचे भारतीय परराष्ट्र सेवेचे अधिकारी असून, त्यांनी बांगलादेशातील उच्चायुक्त आणि थायलंड, अमेरिका यासारख्या देशांमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले आहे. ते 2020 ते 2022 दरम्यान परराष्ट्र सचिव होते आणि कोविड-19 महामारीच्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणाचे नेतृत्व त्यांनी केले. उज्वल निकम हे देशातील एक नामवंत कायदेतज्ज्ञ असून, त्यांनी 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील कसाब खटला, 1993 चे मुंबई साखळी बॉम्बस्फोट, तसेच प्रेमसिंग, प्रियांका बोरा हत्या, मणोहर कडकरे हत्याकांड अशा अनेक गाजलेल्या प्रकरणांत सरकारकडून यशस्वी बाजू मांडली आहे. त्यांच्या तीन दशकांहून अधिकच्या कायदेशीर कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या वतीने अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये काम पाहिले आहे.भारतीय संविधानाच्या कलम 80 अंतर्गत राष्ट्रपती नामांकित सदस्यांची नियुक्ती करतात. साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा यासारख्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना संसदेच्या उच्च सभागृहात स्थान देण्याचा यामागचा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 8.44 वाजता फोन केला अन्..
या निवडीनंतर उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना निकम म्हणाले, या देशाच्या राष्ट्रपती यांनी माजी राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्ती केली. मी कायदेक्षेत्रात जो अभ्यास केला त्याचा हे फळ आहे. मला काल पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 8.44 वाजता फोन केला आणि मराठीत बोलले मी हिंदीत बोलू की मराठीत बोलू. मी त्यांना म्हटलं तुमचे दोन्ही भाषेवर प्रेम आहे. त्यावर त्यांनी मराठीत संवाद साधला. माझ्यावर भाजप पक्षाने लोकसभेला देखील हा विश्वास दाखवला. तो यावेळी ही सार्थ करून दाखवेल. राष्ट्रपतीने निवड केली असल्याने माझ्यावर मोठी जबादारी असेल, असंही निकम यांनी म्हटलं आहे.
मी नेहमी चांगले काम करेल मी निश्चित प्रयत्न करेल. जबाबदारी असली तरी माझ्यावर आशिर्वाद देखील आहे. अनेक खटले चालवत असताना आम्ही डेव्हिड हेडली यांची साक्ष घेतली, त्यावेळी अमित भाई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आम्ही ही साक्ष घातली आणि त्यांचा बुरखा फाडला. आपल्याला विधायक काम करायचे आहे, हा देश एकसंध कसा आहे हे सांगायचं आहे, लोकसभेची निवडणूक एका मुद्द्यावर लढवली गेली. त्यावेळी गैरसमजूत पसरवली गेली. कसाबच्या गोळीने आमच्या शहिदांच्या हत्या झाल्या नाहीच, असे ही पसरवले. हा फेक नारेटिव्ह विधानसभेला हाणून पाडला असंही पुढे उज्ज्वल निकम यांनी म्हटलं आहे.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव
दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीत भाजपचे उत्तर मध्य मुंबईतील उमेदवार राहिलेल्या उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पहिल्यांदाच राजकीय मैदानात उतरलेल्या निकम यांना पहिल्याच निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला. मात्र, भाजपकडून पराभव पचवल्यानंतरही उज्ज्वल निकम यांना नव्याने बक्षीस दिलं होतं. उज्ज्वल निकम यांची पुन्हा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काँग्रेसने उज्ज्वल निकम यांच्या फेरनियुक्तीला विरोध केला होता.
























