मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमध्ये जागा वाटपावरून रणकंदण सुरू असतानाच सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेच्या जागेवरून (Ratnagiri Sindhudurg) शिवसेना आणि भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. या मतदारसंघावर दोन्ही बाजूंकडून दावा केला जात आहे. त्यातच भाजपने आमचा केसाने गळा कापू नये असं वक्तव्य रामदास कदम (Ramdas Kadam)  यांनी केलं होतं. आता त्याला नाव न घेता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी (Narayan Rane) टोला लगावला आहे.  फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल असं राणे म्हणाले. त्यामुळे या जागेवरून आता शिंदे गट आणि भाजप आमने-सामने येणार असल्याचं चित्र आहे. 


शिंदे गटाचे नेते रामदास कदम म्हणाले होते की, आपण मोदी आणि शाह यांच्याकडे पाहून आपण भाजपसोबत आलो आहोत. मात्र केसाने गळा कापू नका, विश्वासघात करू नका असं म्हटलं होत. यावर नारायण राणे यांनी सोशल मीडियावरून यावर प्रतिक्रया दिली आहे. 


काय म्हणाले नारायण राणे? (Narayan Rane Tweet)


नारायण राणेंनी रामदास कदमांना उत्तर देताना एक ट्विट केलंय. त्यामध्ये ते म्हणतात की, आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्‍यांनी आव्‍हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्‍याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्‍हणण्‍याची वेळ येईल.


 






काय म्हणाले होते रामदास कदम? (Ramdas Kadam On BJP) 


आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरती विश्वास ठेवून भाजपासोबत आले आहोत. त्यामुळे विश्वासघात करत केसाने गळा कापण्याचे काम करू नका याची समज त्यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना द्यावी असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं होतं. माझेही नाव रामदास कदम आहे लक्षात ठेवा असा सज्जड इशाराही त्यांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


देवेंद्र फडणवीसांचे दुर्लक्ष


रामदास कदमांना अशी वक्तव्यं करण्याची सवय आहे, आमच्यासारख्या मॅच्युअर लोकांनी या गोष्टीकडे लक्ष देणे योग्य नाही असं देवेंद्र फडणवीसांनी रामदास कदमांना प्रत्युत्तर दिलं. 


नारायण राणे यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत मिळाले. त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये कुरबुरी सुरु झाल्या. राणेंनी मतदारसंघावर दावा करताच शिंदे गटाचे रामदास कदम चवताळले आणि त्यांनी थेट भाजपवर टीकेचे बाण सोडले. मतदारसंघावर दावा ठोकतानाच रामदास कदम यांनी भाजपवर अनेक आरोपही केले.


रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून सुरू झालेला वाद हा मिटतो की त्यात आणखी वाढ होणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. 


ही बातमी वाचा :