Raj Thackeray नाशिक : मनसेचा १८ वा वर्धापन दिन सोहळा (MNS Vardhapan Din) यंदा नाशिकमध्ये पार पडत आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नाशिक शहरात प्रथमच मनसेचा वर्धापन दिन साजरा होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. संपूर्ण नाशिक शहर मनसेमय झाल्याचे चित्र आहे. राज ठाकरे एका शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी जात असताना त्यांचा ताफा तब्बल 15 मिनिटं रस्त्यावरच थांबल्याचे दिसून आले. राज ठाकरेंना महत्त्वाचा फोन आला होता का? अशी चर्चा सध्या रंगली आहे.
गुरुवारी राज ठाकरे सायंकाळी नाशिक शहरात दाखल झाले. यावेळी त्यांचे कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले होते. त्यानंतर आज शुक्रवारी सकाळी त्यांनी काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. यावेळी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी सपत्नीक पूजा केली. तर राज ठाकरेंच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
राज ठाकरेंना महत्वाचा फोन?
त्यानंतर सायंकाळी राज ठाकरे हे शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात होते. त्यावेळी रस्त्यातच अचानक त्यांचा ताफा थांबला. तब्बल १५ मिनिटं राज ठाकरेंचा ताफा रस्त्यावर एकाच ठिकाणी थांबला होता. शाखा उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी जाताना अचानक ताफा थांबल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. राज ठाकरेंना महत्त्वाचा फोन आल्यानं ताफा थांबल्याची चर्चा होत आहे. मात्र ताफा का थांबला? याचे कारण गुलदस्त्यात आहे.
राज ठाकरेंची विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा
दरम्यान, राज ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतले. राज ठाकरे मंदिराच्या बाहेर आले. त्यावेळी त्यांनी वेगवेगळ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. तसेच चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. राज ठाकरे यांनी चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या चित्रांची पाहणी केली. तसेच या विद्यार्थ्यांना राज ठाकरेंनी महत्वाच्या टिप्स दिल्या.
काळाराम मंदिर परिसरातील बॅनर अज्ञातांनी फाडलं
दरम्यान, बुधवारी राज ठाकरेंचे (Raj Thackeray) बॅनर काळाराम मंदिर परिसरात लावण्यात आले होते. बुधवारी रात्री हे बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले होते. गुरुवारी सकाळी बॅनर फाडल्याचे निदर्शनास आले. बॅनर कोणी आणि का फाडले? याचे कारण अद्याप अस्पष्ट होते. या प्रकरणी पोलीस (Police) तपास करत आहेत.
आणखी वाचा