Nagpur : पक्षाच्या सर्वेक्षणात 'पास' होणाऱ्या उमेदवारांनाच मनपा निवडणुकीत संधी दिली जाईल असा इशारा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिला होता. त्याच प्रमाणे वर्षभरापूर्वी झालेल्या आणि आता नुकतेच झालेल्या या दोन्ही सर्वेक्षणानुसार अनेक 'नॉन परफॉर्मिंग' विद्यमानांना मनपा निवडणुकीत डावलले जाणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. निवडणुका आटोपताच नागरिकांशी 'डिस्कनेक्ट' झालेल्या नगरसेवकांचा यात समावेश आहे.
विविध जागांवरील महिला आरक्षणामुळे नगरसेवकांमध्ये धाकधुक होती. मात्र एक दोन जागा वगळता याचा फटका जास्त नेत्यांना बसला नाही. त्यामुळे आरक्षणातून हे नगरसेवक बचावले असले तरी. परफॉर्मन्समुळे मात्र गोत्यात आले असल्याची माहिती आहे.
मागिल निवडणुकीत एका प्रभागात चार वार्ड असल्याने नागरिकांना लहान-लहान समस्यांसाठी नगरसेवकांच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. यावरुन या तक्रारी सोडविण्यासाठी नगरसेवकही पुढाकार घेत नसल्याने फक्त आश्वासन देत होते. त्यामुळे निवडणुकीत यांना सोडून इतर कोणालाही मत देऊ अशी मानसिकता मतदारांनी बनविली होती. त्यामुळे नागरिकांमधील नगरसेवकांबाबतच रोष ओळखून पक्षाने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला असल्याचे कळते.
कोरोना काळात 'नॉट रिचेबल'
कोरोना काळात जवळपास प्रत्येकाने आपल्या जवळच्या व्यक्तीला गमावले आहे. कोणी घरातील व्यक्ती तर कोणी नातेवाईक अथवा मित्र. यावेळी प्रशासनाची गैरसोय, हतबलताही नागरिकांनी अनुभवली. यावेळी मदतीसाठी नगरसेवकांपेक्षा तर त्यांचे काही कार्यकर्ते सज्ज होते. अनेक पक्षाच्या युवा कार्यकर्त्यांनी यात मोलाची कामगिरी बजावली. ऑक्सिजन, औषधी, रुग्णालयातील बेड आदींसाठी हे युवा कार्यकर्ते स्वतच्या जीवाची पर्वा न करता धडपड करीत होते. त्यामुळे नगरसेवकांपेक्षा तुम्ही पुरले असेही अनेक नागरिकांनी त्यावेळी बोलून दाखवले होते. मात्र या काळात जवळपास सर्वच पक्षांचे नगरसेवक गायब होते आणि त्यांचे फोनही नॉट रिचेबल होते.
चमकोगिरीवर आक्रोष
काम असताना हल्ली गायब होणारे नगरसेवक मनपाच्या निधीतून होणाऱ्या विकास कामाच्या भूमिपूजनात मात्र 'प्रगट' होत होते. तसेच परिसरात एखाद्या नेत्याचा कार्यक्रम असल्यास गर्दी जमविण्यासाठी कार्यकर्त्यांना 'भाव' देणाऱ्यांचाही अनुभव नागरिकांनी घेतला. शिवाय मनपाच्या लसीकरण केंद्रावर स्वतःचे पोस्टर लावणाऱ्यांना तर नागरिकांनी प्रचंड झापले होते. अशा अनेक घटना मनपाच्या विविध लसीकरण केंद्रांवर घडल्या होत्या. या सर्वांची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली असल्याची माहिती आहे.
काम कोणाचेही असो, फोटो काढू द्या!
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक महिला नगरसेविका या कोरोनापूर्वीपासूनच निष्क्रीय होत्या. या संदर्भातील तक्रारी पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांकडे केल्या होत्या. याचीही नोंद पक्षाने घेतली असल्याची माहिती आहे. मात्र निवडणुकीची चाहूल लागताच या नगरसेविका मात्र सोशल मीडियावर 'अॅक्टिव्ह' झाल्या आहेत. नेहमी गायब असणाऱ्या या नगरसेविका प्रभागात कुठलेही काम सुरु असले तर त्याचे फोटो काढण्यासाठी आणि श्रेय घेण्यासाठी मात्र सतर्क असल्याचे दिसून येत आहे.
इतर बातम्या