मविआच्या 'जोडे मारो'त पोलिसांची धरपकड, छत्रपती संभाजीनगरमध्ये पुतळा छातीशी कवटाळत आंदोलक धावला, अन्..
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे.
Chhatrapati Sambhajinagar: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीनं गेटवे ऑफ इंडियाच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत घटनेचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआच्या 'जोडे मारो' आंदोलनात पोलिसांची धरपकड झाली. जोडे मारण्यासाठी प्रतिकात्मक पुतळा घेऊन येणाऱ्या आंदोलकाला पकडण्यासाठी पोलीस धावले. यावेळी पोलिसांपासून वाचण्यासाठी आंदोलकाला पुतळा छातीशी कवटाळत पळावं लागल्याचं दिसून आलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. मुंबईत मविआनं एल्गार पुकारलाय. अनेक दिग्गज नेत्यांसह कार्यकर्ते आंदोलक मोर्चा काढत असून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्येही मविआची आंदोलने सुरु आहेत.
नक्की झालं काय?
छत्रपती संभाजीनगरच्या क्रांतीचौक परिसरात मविआचे कार्यकर्ते, आंदोलक जमले होते. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला होता. दरम्यान, बाहेरच्या बाजूने एक कार थांबली. त्यातून एक आंदोलक जोडे मारण्यसाठी पांढऱ्या कापडात गुंडाळलेला प्रतिकात्मक पुतळा घेऊन क्रांतीचौकाच्या दिशेने चालू लागला. यावेळी चार पाच पोलिसांनी पुतळा काढून घेण्यासाठी आंदोलकाला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांपासून वाचण्यासाठी आंदोलकाला पुतळा धरत पळावं लागलं. यावेळी क्रांतीचौकात मोठ्या प्रमाणात मविआचे कार्यकर्ते आंदोलक जमले होते.
क्रांती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
मविआच्या जोडे मारो आंदोलनासाठी क्रांती चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून परिसरात कार्यकर्त्यांचा मोठा जमाव आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही आज शहरात असल्यानं जमावाचं नियंत्रण करण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी करण्यात आल्याचं चित्र आहे.
मोर्चाला परवानगी नाही, मुंबईत कडक सुरक्षा
मुंबई पोलिसांनी महाविकास आघाडीला (एमव्हीए) आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. यानंतरही विरोधक मोर्चे काढत आहेत. विरोधकांच्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे पर्यटकांच्या ये-जा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
मी त्यांना शिवाचा गद्दार म्हणेन, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवाजी महाराजांचा पुतळा हवेतून कसा पडला? राज्यात भ्रष्टाचारात गुंतलेले सरकार सुरू आहे. स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली करोडोंचा भ्रष्टाचार होणार आहे. मी त्यांना शिवाचा गद्दार म्हणेन. शरद पवार म्हणाले की, पुतळ्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. ही बाब गंभीर आहे.