मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे यांनी लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटले, असा आरोप केला होता.  या आरोपानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राऊतांना नोटीस पाठवली आहे. तीन दिवसांत माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा इशारा शिंदे यांनी राऊतांना दिला आहे. यावरच आता राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असं म्हणत राऊतांंनी सत्ताधाऱ्यांवर टीका केलीय. ते आज (1 जून) पत्रकार परिषदेत बोलत होते.


त्यांनी कोर्टात खटला दाखल करावा, काहीही अडचण नाही


मी आजच भारतात आलो. परदेशात असताना मला नोटीस आल्याचे समजले. राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे, जे सरकार भ्रष्टाचारातूनच निर्माण झाले आहे. डुक्कर ज्या प्रमाणे चिखलातच असते, त्या प्रमाणे हे भ्रष्टाचाराच्या चिखलातील डुकरं आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या घटनाबाह्य सरकारवर मी भ्रष्टाचाराचा आरोप केला म्हणून मला नोटीस पाठवण्यात आली. मी ही नोटीस स्वीकारलेली आहे. त्यांनी या प्रकरणात माझ्याविरोधात कोर्टात खटला दाखल कारावा. माझी काहीही अडचण नाही, असं खुलं आव्हान संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं  


...मग संपूण जनतेला नोटीस पाठवणार का?


संपूर्ण देश या सरकारला तसेच सरकारमधील आमदार आणि मंत्र्यांना 'पन्नास खोके एकदम ओके' या नावानेच ओळखतो. त्यामुळे तुम्ही महाराष्ट्र, देशातल्या प्रत्येकालाच नोटीस पाठवणार का? या लोकांनी महाराष्ट्रातल्या निवडणुकीत पैशांचा पाऊस पाडला हे सत्य आहे. मी नाशिकमधला एक व्हिडीओ दाखवला होता. त्या व्हिडीओत बॅगा नेल्या जात होत्या. त्या बँगांमध्ये पैसेच होते, असे राऊत यांनी ठणकावून सांगितले.


चार जूननंतर चक्र उलटं फिरणार


पण कितीजरी पैसे वाटले तरी एकनाथ शिंदे, अजित पवार यांना महाराष्ट्रात यश मिळत नाही. माझी ही भूमिका कायम आहे. सत्य बोलल्यावर या देशात कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागते किंवा तुरुंगात पाठवलं जातं. पण चार जूननंतर चक्र उलटं फिरणार आहे. आम्हाला चिंता नाही, भीती नाही, अशी परखड भूमिका राऊत यांनी घेतली.


हेही वाचा :


Sanjay Raut: आम्ही तुरुंगात गेलो, आजारीही पडलो, डावा हात चालत नाही, पण कधीही त्याचं भांडवल केलं नाही: संजय राऊत


Sanjay Raut: मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाहीत, भाजप एकसंध आहे की नाही हे 4 जूननंतर कळेल: संजय राऊत