पुणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) पुन्हा चौकशी सुरु करण्यात आली होती. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी, 'मला कोणीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत नाही', असे म्हटले. 


एसीबीने जरंडेश्वर कारखाना प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली असेल तर तुम्हाला काय त्रास होतोय? ज्या कोणाविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर त्याची चौकशी करणे, हे संबंधित यंत्रणेचे काम आहे. एखाद्या प्रकरणात एका तपास यंत्रणेने चौकशी बंद केली पण नंतर दुसऱ्या डिपार्टमेंटला त्या प्रकरणाची चौकशी करावी, असे वाटले तर त्यांनी ते करण्यात गैर काय आहे? तुमची, आमची किंवा आणखी कोणाचीही चौकशी करायची असेल तर तपास यंत्रणांना ती चौकशी करु शकतात, असे अजित पवार यांनी म्हटले. 


माझी काळजी करु नका, मला कोणीही जाणीवपूर्वक अडचणीत आणत नाही: अजित पवार


जरंडेश्वर प्रकरणाची चौकशी पु्न्हा सुरु झाल्यामुळे तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे का, असे अजित पवारांना विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी म्हटले, मला जाणीवपूर्वक कोणीही अडचणीत आणत नाही. काळजी करु नका. तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी असताना मला काळजी नाही. मी राजकीय जीवनात काम करताना काहीही वेडवाकडं  काम करत नाही. त्यामुळे मी निर्धास्त असतो, असे अजित पवार यांनी सांगितले. 


अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची भक्कम पाठराखण: 


पुणे अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुनील टिंगरे यांची भक्कमपणे पाठराखण केली. आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास त्यांना संबंधित ठिकाणी जावं लागतं. एकदा सुनील टिंगरेंच्या मतदासंघात स्लॅब कोसळला होता. त्यावेळीही ते मदतीला धावून गेले होते. लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या ते करतात. ज्यावेळेस आपल्या पुण्यात पूर येतो, एखादी घटना घडते तेव्हा स्थानिक आमदार उपस्थित असतात, घटनास्थळी जातात आणि मदत करण्याच्या प्रयत्न करतात. कल्याणीनगर परिसरातील अपघातानंतर रात्री उशीरा सुनील टिंगरेंना फोन आला. आता फोन कोणाचा आला हे त्यांनी सांगितलं आहे. मग सुनील टिंगरे पोलीस स्टेशनला गेले होते. सुनील टिंगरेंनी कोणालाही पाठिशी घाला, असं सांगितलं नाही, असे सांगत अजित पवार यांनी टिंगरेंची पाठराखण केली.


आणखी वाचा


मुलाला, बापाला, बापाच्या बापाला पण अरेस्ट केलं; सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही: अजित पवार