(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray: विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचं काहीही होणार नाही, हे केवळ झुलवतायत: राज ठाकरे
Maratha Reservation: राज ठाकरे यांनी आज सकाळी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनासंदर्भात भाष्य केले.
मुंबई: राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात मंगळवारी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. या अधिवेशनात मराठा आरक्षणाचा कायदा मंजूर करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या या कृतीमुळे मराठा आंदोलकांचा लढा यशस्वी ठरला, असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र, मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी हे चित्र फसवे असल्याचे सांगितले. विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) काहीही होणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले. ते सोमवारी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी राज ठाकरे यांना मराठा आरक्षणासाठी बोलावण्यात आलेल्या विशेष अधिवेशनाविषयी विचारणा करण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी म्हटले की, विशेष अधिवेशन बोलावून काही होणार नाही. हा विषय राज्याचा नाही. हा केंद्राचा आणि सुप्रीम कोर्टातील विषय आहे. मराठा आरक्षणाच्या विषयात अनेक तांत्रिक समस्या आहेत. त्या समस्या सुटल्याशिवाय हा विषय पुढे जाणार नाही. हे सगळं झुलवलं जातंय, यामधून हाताला काही लागणार नाही. मी त्यादिवशी मनोज जरांगे यांना समोर जाऊन सांगितलं होतं ना, काही होणार नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
गेल्याच आठवड्यात सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल स्वीकारला होता. त्यानुसार मराठा समाजातील कुणबी नोंदी नसलेल्या लोकांना स्वतंत्र आरक्षण देण्यात येणार आहे. तर कुणबी नोंदी असलेल्या मराठा बांधवांना पूर्वीच्या कायद्याप्रमाणे ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण लागू होईल. मात्र, विशेष अधिवेशनात पारित होणाऱ्या कायद्यात कुणबी नोंदीचे आरक्षण सगेसोयऱ्यांनाही लागू होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
शिक्षकांना निवडणुकीच्या कामात जुंपण्यावरुन राज ठाकरे आक्रमक. शिक्षक निवडणुकीच्या काळात कामं करण्यासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित करा. आतापासून निवडणूक आयोगाने शिक्षकांना सांगितले आहे, रुजू व्हा. पुढील तीन महिने शिक्षक त्यांना हवेत, हे शिक्षक कशासाठी हवेत? मी दादरच्या शारदाश्रम शाळेतील शिक्षकांना सांगितले आहे की, तुम्ही निवडणुकीच्या कामासाठी रुजू होऊ नका. तुमच्यावर कोण काय कारवाई करते, ते मी पाहतो, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
निवडणूक आयोगाचा आयुक्त पाच वर्षे काय करतो, तुम्हाला पाच वर्षात यंत्रणा उभी करता येत नाही का? ही पहिली निवडणूक आहे का, किती लोकं लागणार, ते तुम्हाला माहिती नाही. शिक्षकांचे काम विद्यार्थ्यांना शिकवणे हे असते. निवडणूक आयोग शिस्तभंगाची कारवाईची भीती दाखवतो. उलट आयोगावरच कारवाई केली पाहिजे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
आणखी वाचा
राज ठाकरेंना महायुतीत घेण्यासाठी दिल्लीत खलबतं, मनसे ठरणार महायुतीचा नवा भिडू?