Miraj Vidhansabha : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादी बरोबरच आता काँग्रेसनेही भाजपला दे धक्का सुरू केलाय.  मिरजमध्ये काँग्रेसकडून भाजपला धक्का देण्यात आला असून भाजप अनुसूचित जाती- जमाती आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय. या प्रवेशामुळे मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसमधून मोहन वनखंडे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.


मोहन वनखंडे यांची राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या संविधान सन्मान सभेस हजेरी


मोहन वनखंडे यांची मिरजचे भाजपचे आमदार, कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख होती. त्यामुळे मिरजेत भाजपचे आमदार सुरेश खाडे आणि काँग्रेसकडून मोहन वानखंडे यांच्यामध्ये लढत होण्याचे जवळपास निश्चित आहे. कोल्हापूरमधील  आजचा राहुल गांधींचा दौरा आटोपल्यानंतर महाराष्ट्राचे प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,  माजी मुख्यमंत्री  पृथ्वीराज  चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार  विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत मोहन वानखडे यांनी काँग्रेस पक्षात  प्रवेश केला. वनखंडे यांनी कोल्हापूर येथील लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या संविधान सन्मान सभेस हजेरी लावली.


वनखंडे यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती


सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे निकटचे सहकारी तथा भाजपचे मिरज विधानसभा क्षेत्राचे माजी प्रचार प्रमुख प्रा.मोहन वनखंडे यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मिरज विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून त्यांची उमेदवारी निश्‍चित मानली जात आहे. पालकमंत्री खाडे यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळख असलेले आणि खाडे यांच्या जत व मिरज विधानसभा निवडणुकीत प्रमुख सहकारी म्हणून काम करणारे वनखंडे यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. मात्र, विद्यमान मंत्री व सलग चार निवडणुका खाडे यांनी जिंकल्या असल्याने त्यांना वगळून अन्य कोणाच्या नावाचा विचार केला जाणार नसल्याचे लक्षात आल्यानंतर भाजपचा त्याग करून त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.  


गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडून भाजपला मोठे धक्के देण्यात आले होते. आता काँग्रेसनेही मिरजेत भाजपला मोठा धक्का दिलाय. यापूर्वी कागलमधून समरजीत घाटगे, इंदापुरातून हर्षवर्धन पाटील, वडगाव शेरीमधून बापूसाहेब पठारे, अशा दिग्गज नेत्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलीये. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ramraje Naik Nimbalkar : तुतारी हाती घेण्याचा निर्णय नाहीच, पण रामराजे निंबाळकरांनी भाजपबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला, म्हणाले....