Manikrao Kokate Health Update: माणिकराव कोकाटेंची अँजिओग्राफी झाली, पोलीस हॉस्पिटलमधून हलेनात, लीलावती रुग्णालयाचा मोठा निर्णय
Manikrao Kokate Health Update: मागील दीड तासापासून नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफी पार पडली आहे.

Manikrao Kokate Health Update: नाशिकच्या सदनिका घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर मंत्रिपदाचा राजीनामा देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांच्यावर आज मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) अँजिओग्राफी करण्यात आली. उच्च रक्तदाबाचा त्रास वाढल्यामुळे सध्या कोकाटे अतिदक्षता विभाग (ICU) मध्ये उपचार घेत आहेत.
सध्या रुग्णालयात त्यांची मुलगी सीमंतिनी कोकाटे आणि पत्नी सीमा कोकाटे उपस्थित असून, वैद्यकीय टीम त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवत आहे. डॉक्टरांच्या प्राथमिक अहवालानुसार, कोकाटे यांना पूर्ण विश्रांतीची आवश्यकता आहे आणि कोणताही ताण येऊ नये, असा सल्ला दिला आहे.
Manikrao Kokate Health Update: लीलावती रुग्णालयाचा मोठा निर्णय
मागील जवळपास दीड तासापासून नाशिक पोलिसांची टीम लीलावती रुग्णालयात आहेत. माणिकराव कोकाटे यांच्यावर अँजिओग्राफी करण्यात आली आहे लीलावती रुग्णालय प्रशासन दुपारी 2 वाजता मेडिकल बुलेटिनद्वारे कोकाटेंच्या प्रकृतीबाबत अपडेट देणार आहे. अँजिओग्राफीच्या अहवालानंतरच वैद्यकीय उपचार, डिस्चार्ज किंवा पुढील देखरेखीबाबत निर्णय घेतला जाईल. जो वैद्यकीय अहवाल येईल तो अहवाल पोलीस कोर्टात सादर करणार आहेत. त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंच्या प्रकृतीबाबत काय अपडेट समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Manikrao Kokate Health Update: माणिकराव कोकाटेंच्या याचिकेवर तीन वाजता सुनावणी
दरम्यान, माणिकराव कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाला आव्हान देत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. आज (दि. १९) दुपारी ३ वाजता न्यायालयात सुनावणी होणार असून, शिक्षेला स्थगिती मिळाल्यास कोकाटेंची अटक टळेल आणि त्यांची आमदारकी कायम राहील, असा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.
manikrao kokate Scam: नेमकं प्रकरण काय आहे?
1995 ते 1997 या कालावधीत माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांनी शासनाकडून मिळणाऱ्या शासकीय सदनिका घेतल्या होत्या. त्या वेळी त्यांनी आपले उत्पन्न कमी असल्याचे आणि स्वतःकडे अन्य कोणतेही घर नसल्याची माहिती शासनाला दिली होती. या आधारे त्यांना शासनामार्फत सदनिका मंजूर करण्यात आल्या. मात्र या प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप पुढे आला. या संदर्भात तत्कालीन अधिकाऱ्यांनी तक्रार नोंदवली होती. 1995 साली माणिकराव कोकाटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या आधारे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 1997 पासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. अखेर न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे या दोघांना दोषी ठरवत प्रत्येकी दोन वर्षांची कारावासाची शिक्षा आणि 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा
























