Third Front Talk : भारतीय जनता पक्षाच्या (BJP) विरोधात तिसरी आघाडी उभी करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी सोमवारी बिगरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्र्यांशी फोनवर संवाद साधून तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. ममता यांच्यानंतर मंगळवारी देशाचे माजी पंतप्रधान आणि जेडी (एस) नेते एचडी देवेगौडा यांनी देखील तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्याशी फोनवर चर्चा केली.


के चंद्रशेखर राव यांनी सध्या केंद्रातील मोदी सरकारविरोधात आघाडीच उघडली आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहे. तसेच त्यांनी भाजपवर अपप्रचार केल्याचा आरोप देखील केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवेगौडा यांनी के चंद्रशेखर राव यांना फोन करत त्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच ते केसीआर यांना म्हणाले आहेत की, ''तुम्ही खूप मोठी लढाई लढली आहे, आम्ही तुमच्यासोबत आहोत, आम्हाला जातीयवादी शक्तींशी लढायचे आहे आणि देशाला वाचवायचे आहे.'' 


ममता बॅनर्जींबद्दल बोलायचे झाले तर 2014 पासून त्या मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. ३ मार्च रोजी त्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये जाऊन निवडणूक सभा घेणार आहेत. उत्तर प्रदेश भाजप पासून वाचल्यास देश वाचेल, असं त्या म्हणाल्या आहेत. 2024 मध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असल्यास उत्तर प्रदेश आणि बंगालसारखी मोठी राज्ये सर्वात महत्त्वाची ठरणार आहेत. 


ममतांचा भाजपसोबत काँग्रेसवरही हल्लाबोल  


ममता बॅनर्जी यांनी फक्त भाजपाला नाही तर काँग्रेसलाही लक्ष केलं आहे. त्या म्हणाल्या आहेत की, काँग्रेसचे कोणत्याही प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध नाहीत. सर्वांना एका व्यासपीठावर आणणे हे धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांचे कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. मी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षालाही व्यापक हितासाठी आमच्या सोबत येण्यास सांगितले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही. मी यासाठी आणखी काही करू शकत नाही. माझे कोणाशीही वैयक्तिक वैर नाही. काँग्रेस स्वत:च्या मार्गाने जाऊ शकते, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ, असं त्या म्हणाल्या आहेत. दरम्यान, मनात बॅनर्जी या तिसरी आघाडी उभी करण्यासाठी बिगरभाजप शासित राज्यातील मुख्यमंत्री आणि पक्षांशी संवाद साधत आहेत.     

इतर महत्त्वाच्या बातम्या :