(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंकजा मुंडेंना कॅबिनेट मंत्री करा; तणावपूर्ण शांततेत बीडमध्ये झळकले बॅनर, दुसरीकडे आज परळी बंद
केंद्रातील मोदी सरकार 3.0 च्या सरकारची आज स्थापना होत असून मंत्रिमंडळाचा मंत्री विस्तारही होणार आहे
बीड: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदींसह एकूण 46 खासदार आज मंत्रीपदाची शपथ घेत असल्याची माहिती आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांना मोदी सरकार 3.0 मध्ये स्थान मिळणार नाही. तर, महाराष्ट्रातून एकूण 5 मंत्र्याची नावे समोर आली आहेत. मात्र, बीडमध्ये पराभवाचा धक्का बसलेल्या पंकजा मुडेंचे (Pankaja Munde) कार्यकर्ते प्रचंड नाराज आणि भावूक झाले आहेत. त्यातूनच, पंकजा मुंडेंना केंद्रात कॅबिनेटमंत्रीपद देण्याची मागणी करण्यात येत आहे. बीड (Beed) लोकसभेत यंदा बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. या लढतीत पंकजा मुंडेंचा 6 हजार मतांनी पराभव झाला. तरीही, त्यांच्यासाठी मंत्रिपदाची मागणी होत आहे.
केंद्रातील मोदी सरकार 3.0 च्या सरकारची आज स्थापना होत असून मंत्रिमंडळाचा मंत्री विस्तारही होणार आहे. या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येला बीड शहरभर पंकजा मुंडे यांना वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेटमंत्रीपद द्यावं, अशा मागणीचे बॅनर झळकले आहेत. विशेष म्हणजे बीड शहरभर हे बॅनर लागल्याचे दिसून येत आहे. पंकजा मुंडेंचा कार्यकर्ता असलेल्या गणेश लांडे यांनी हे बॅनर लावलेले असून ताईंना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं, यासाठी बॅनरबाजी करण्यात आल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे.
देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुका पार पडल्या, त्यानंतर 4 जून रोजी या निवडणुकांचा निकालही जाहीर झाला. बीड जिल्ह्यात पंकजा मुंडे या खासदार म्हणून निवडून येतील असा कयास लावला जात होता. मात्र, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा विजय झाला आणि पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव झाला. मात्र, त्यानंतरही कार्यकर्त्यांनी जिद्द हरली नाही, पंकजा मुंडेंनीही कार्यकर्त्यांना आवाहनही केलं होतं की, जय पराजय हे राजकारणात होतच राहतात. मात्र, धीर सोडून चालत नाही. पण, बीडमध्ये दोन दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांच्या विरोधात वादग्रस्त विधान करण्यात आलं. त्यामुळे बीड जिल्ह्यातील वातावरण हे तणावाचं निर्माण झालं होतं. हे तणावपूर्ण वातावरण ताजं असतानाच बीड शहरभर महाराष्ट्रामध्ये भाजपची ताकद वाढवण्यासाठी पंकजा मुंडे यांना पक्ष श्रेष्ठ आणि वरिष्ठ नेतृत्वाने कॅबिनेट मंत्रीपद द्यावे या मागणीचे बॅनर झळकले आहेत.
दरम्यान, बीडमध्ये तणावपूर्ण शांतता असून बीड जिल्ह्यातील पाथर्डी, शिरुर शहरात बंद पुकारण्यात आला होता. त्यानंतर, आज परळी शहरात बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे, पोलीस प्रशासनही येथे अलर्ट मोडवर आहे.
महाराष्ट्रातील किती जणांना मंत्रिपद?
बीड शहरात लागलेल्या या बॅनरजी चर्चा सर्वत्र होत असून आजच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडेही सर्वांच्या नजरा आहेत. महाराष्टातून किती जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार हे पाहण्यासाठी आजच्या शपथविधी सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, राज्यातील 5 खासदारांना केंद्रातून फोन आल्याची माहिती आहे.