मुंबई: तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायला येत्या 12 एप्रिल पासून सुरु होईल. मात्र, अजूनही महायुतीच्या (Mahayuti) काही जागा वाटपाचा पेच सुटलेला नाही. नेमक्या या जागाचा पेच का सुटला नाही त्याची कारणे नेमकी आहेत तरी काय पाहू याच विषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. राज्यात पहिल्या टप्प्यातील प्रचाराने जोर धरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांची चंद्रपूरमध्ये पहिली सभा देखील पार पडली. महाविकास आघाडीचे उमेदवार निश्चित झालेत पण महायुतीच्या काही जागाचा पेच काही सुटताना दिसत नाही. पेच सुटत नसल्याने इच्छुक उमेदवारांची चांगलीच डोकेदुखी वाढली आहे.


रत्नागिरी-सिंधुदुर्ग


सर्वाधिक चर्चा सध्या याच लोकसभा मतदार संघाची सुरु आहे..या लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेनेकडून किरण सामंत इच्छुक आहेत. तर दुसरीकडून भाजपकडून नारायण राणे यांच्या नावावर जोर दिला जातोय.एकीकडे किरण सामंत जागा लढवण्यावर ठाम तर दुसरीकडे भाजपचा दावा यामुळे या जागेचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला आहे.


दक्षिण मुंबई


या लोकसभा मतदार संघासाठी भाजप इच्छूक असून, शिंदेंच्या शिवसेनेने देखील या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि यशवंत जाधव तर भाजपकडून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा आहे. आता ही जागा नेमकी कुणाला सोडायची यावर अजून चर्चा सुरु आहे. 


नाशिक 


नाशिक लोकसभा मतदारसंघातून सध्याचे खासदार हेमंत गोडसे यांना तिकीट मिळावे अशी मागणी गोडसे समर्थक करत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्यात येणार अशी माहिती आहे. भुजबळ याना उमेदवारी दिली तर गोडसे समर्थक नाराज होतील याचमुळे ही जागाही अजून जाहीर करण्यात आलेली नाही.


उत्तर पश्चिम मुंबई 


उबाठा गटाकडुन अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी जाहीर झालेली असताना महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. शिवसेना- भाजपकडे निवडून येणारा हक्काचा उमेदवार नसल्याने अजून निर्णय झालेला नाहीय. 


ठाणे 


या लोकसभा मतदार संघावर भाजपने दावा केला असून, शिवसेना देखील ही जागा सोडायला तयार नाही. शिवसेनेकडून रवींद्र फाटक, नरेश म्हस्के इच्छुक आहेत तर भाजपकडून सजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे हा पेच कधी सुटणार असा प्रश्न निर्माण झालाय 


पालघर


पालघरचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित असतील असे सांगितले जातं असले तरी ते भाजपच्या चिन्हावर लढणार की शिवसेना हा निर्णय व्हायचा बाकी आहे. पालघरची जागा शिवसेनेची असून, राजेंद्र गावित यांनी पुन्हा शिवसेनेच्या चिन्हवर निवडणूक लढवावी, असे शिवसेनेचे मत आहे.


उत्तर मध्य


भाजपला काही करून देशात ४४० हून अधिक जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे त्यांनी पूनम महाजन यांच्याऐवजी जिकूंन येणारा उमेदवार दयायचे हे  ठरवले आहे. अनेक नावाबाबतही भाजपने चाचपणी  देखील केली आहे. मात्र, तेही नाव अंतिम झाले नाही. त्यामुळे आता आमदार आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा सुरू आहे


छत्रपती संभाजीनगर 


पालकमंत्री संदीपान भुमरे यांचे नावही उमेदवारीसाठी चर्चेत होते. मात्र, ते निवडून येत असणारा पैठण हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघात येतो. स्वत:च्या हक्काचे मतदान नसताना त्यांना उमेदवारी देण्याबाबत नेत्यांमध्ये संभ्रम आहे. दुसरीकडे अपक्ष म्हणून का असेना निवडणुकीमध्ये उतरुच असे सांगणारे विनोद पाटील यांनी शिंदे गटातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे इथून उमेदवार कोण द्यायचा याची चर्चा महायुतीत सुरु आहे.


सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्या जागांचा पेच कायम आहेत त्या जगाबाबत स्वतः देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावर त्या त्या भागातील नेत्यांना बोलावून वाद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे हा जागाचा पेच लवकरच सुटेल असा विश्वास महायुतीचे नेते व्यक्त करत आहेत. रत्नागिरी- सिंधुदुर्ग असो, ठाणे, संभाजी नगर असो की मग मुंबईतल्या दोन जागा असो महायुतीने लवकर उमेदवार घोषित करावे अशी भावना इच्छुक उमेदवारांची आहे. त्यामुळे अजूनही पेच सुटला नसलेल्या जागाचे उमेदवार या आठवड्यात तरी जाहीर होतील का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


आणखी वाचा


'आम्हाला फसवलंय, राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला पाडणार', मनोज जरांगे पाटलांचा नाशकातून निर्धार!