ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मंगळवारी गुढीपाडवा मेळाव्यात महत्त्वाची घोषणा केली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मनसे (MNS) महायुतीला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासारख्या खंबीर नेत्याची गरज आहे. त्यामुळेच आपण महायुतीला पाठिंबा देत असल्याचे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या या घोषणेनंतर भाजपसह महायुतीतील प्रमुख निर्णयांनी राज ठाकरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले. 


मात्र, महायुतीने राज ठाकरे यांचा पाठिंबा घेतल्याने ठाण्यातील भाजपचे उत्तर भारतीय पदाधिकारी संतापले आहेत. राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या काळात परप्रांतीयांविरोधात जोरदार आघाडी घेतली होती. मनसेच्या या आंदोलनावेळी बिहार आणि उत्तर प्रदेशातून आलेल्या नागरिकांना मनसैनिकांनी चोप दिला होता. त्यामुळे राज ठाकरे यांची अँटी-उत्तर भारतीय इमेज तयार झाली होती. त्याची सल अजूनही उत्तर भारतीय समाजाच्या मनात आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या पाठिंब्यामुळे ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी नाराज झाले होते.


या नाराज पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा पाठिंबा घेणाऱ्या भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. राज ठाकरे महायुतीत सामील झाल्याने ठाण्यातील भाजपच्या उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगितले जाते. ज्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना कायम त्रास दिला, 'उत्तर भारतीय हटाव', अशी भूमिका घेतली त्यांना महायुतीत घेतल्याने अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटात पक्ष प्रवेश केला. 


मातोश्रीवर जाऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिवबंधन बांधलं


उत्तर भारतीय आणि हिंदी भाषिक यांच्यात थोडी नाराजी आहे. त्यातला एक भाग म्हणून कालच या पदाधिकाऱ्यांनी  राजीनामा दिला आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. उत्तर भारतीय असतील, हिंदी भाषिक असतील त्यावर ज्या पद्धतीने अन्याय झाला हो,त्यांना न्याय मिळाला नाही. आता राज ठाकरे यांना महायुतीत घेतल्याने उत्तर भारतीय पदाधिकाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे ही मंडळी शिवसेना ठाकरे गटात सामील झाल्याचे खासदार राजन विचारे यांनी सांगितले. भाजपच्या या नाराज पदाधिकाऱ्यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनगटावर शिवबंधन बांधून घेतले. 


आणखी वाचा


शिंदे- फडणवीस म्हणाले, आपण एकत्र येऊन काहीतरी करु, राज ठाकरे म्हणाले, शी...!