मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुलनेने सरस कामगिरी केली. त्यांचा एकही आमदार फुटला नाही. उलट आपल्या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी अन्य पक्षातील आमदारांची मतं खेचून आणण्यात अजित पवार यशस्वी ठरले. या निवडणुकीत अजित पवार यांनी बाजी मारली. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा प्लॅन मात्र सपशेल अपयशी ठरला. 


निवडणुकीत नेमकं काय घडलं? 


अजित पवार यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जे या दोन उमेवदारांना तिकीट दिलं होतं. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यात अजित पवार यशस्वी ठरले. विजयासाठी पहिल्या पसंतीच्या 23 मतांचा कोटा ठरलेला होता. अजित पवार यांच्याकडे एकूण  40 आमदार आहेत. निवडणुकीत मात्र अजित पवार यांच्या उमेदवारांना पहिल्या पसंतीची एकूण 47 मतं मिळाली. म्हणजेच अन्य पक्षांची एकूण 7 मते खेचून आणण्यात अजित पवार यांना यश आले. या निवडणुकीत शरद पवार यांची राष्ट्रवादी तसेच काँग्रेस पक्षाची मतं फुटल्याचा दावा केला जातोय. याच फुटलेल्या काही मतांपैकी काही मतं अजित पवार यांच्या दोन्ही उमेदवारांना मिळाली असावीत, असा अंदाज व्यक्त केला जातोय. 


गुरुवारच्या रात्री नेमकं काय घडलं?


आपला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी अजित पवार यांना आणखी काही मतांची जुळवाजुळव करणं गरजेचं होतं. त्याचीच जुळवाजुळव अजित पवार गुरुवारी करत होते. आपल्या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी अजित पवार यांनी स्वत: रणनीती आखली. लोकसभा निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता या विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्यांना कोणताही धोका पत्करायचा नव्हता. अजित पवार गुरुवारी राज्य मंत्रिमडंळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. विधानसभेच्या अध्यक्षांनी ठेवलेल्या चहापानालाही ते गेले नाहीत. बाहेरून कोणती मतं आणायची? ती कशी आणायची? याची राणनीती अजित पवार यांनी आखली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनीदेखील ही रणनीती आखताना महत्त्वाची भूमिका बजावली.  


...अन् अजित पवार यांचे दोन्ही उमेदवार निवडून आले


प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीदेखील अजित पवार जातीनं मतदानाच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते. प्रत्येक आमदार त्यांची भेट घेऊनच मतदानाला जात होता. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून मतदानाच्या आदल्या दिवशी सर्व आमदारांना एकत्र करण्यात आलं होतं. याच नियोजनबद्ध रणीनतीमुळे अजित पवार यांचे दोन्ही उमेदवार निडवून आले. त्यांना इतर पक्षांची सात मते खेचून आणण्यात यश आलं.   


शरद पवार यांनी समर्थन दिलेला उमेदवार पराभूत


दुसरीकडे शरद पवार यांना मात्र या निवडणुकीत फटका बसला. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने शेकापचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. जयंत पाटील यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करू, अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली होती. पण या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव झाला. पाटलांच्या विजयासाठी अन्य पक्षांची मतं खेचून आणण्यात शरद पवार यांच्या पक्षाला यश आले नाही


हेही वाचा :


Maharashtra Vidhan Parishad election Result : तिसरा उमेदवार उभा करून मविआने काय मिळवलं? काय गमवलं?


Jayant Patil on Vidhan Parishad Election : काही लोकांकडे पैसे खर्च करण्याची मोठी क्षमता,अशा इले्क्शनमध्ये फायदा होतो, जनतेच्या निवडणुकीत नाही : जयंत पाटील