मुंबई : महायुतीमध्ये (Mahayuti) नाशिक लोकसभेची (Nashik Lok Sabha) जागा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाला मिळेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे तर ठाणे लोकसभेची (Thane Lok Sabha) जागा ही भाजपने मागितली आहे. लोकसभेच्या दोन महत्त्वाच्या शिवसेनेच्या खासदार असणाऱ्या जागा भाजप आणि राष्ट्रवादीने मागितल्यामुळे शिवसेनेत नाराजी आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा जागा मिळवण्यासाठी भाजप आणि शिवसेनेवर दबाव तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा ठाणे आणि नाशिक जागा आपल्याकडेच राहावी यासाठी इतर दोघांवर दबाव तर तिसरीकडे राष्ट्रवादीकडून सातारा लोकसभेची मिळालेली जागा आपल्याकडेच राहावी यासाठी भाजपचा आपल्या इतर दोन मित्र पक्षांवर दबाव पाहायला मिळतोय. त्यामुळे अद्याप जागावाटप पूर्ण होऊ शकलेले नाही. महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून एकमेकांच्या विरोधात दबावतंत्राचं राजकारण केलं जात असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
महायुतीमध्ये जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटला नसल्याचा पाहायला मिळत आहे. महायुतीमध्ये अद्याप ठाणे, नाशिक सातारा या जागांवरून एकमेकांवर दबाव तंत्राचा वापर सुरू आहे. भाजपकडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ठाणे ची जागा आपणाला द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकची जागा मागण्यात आली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या जागा ह्या सध्या शिवसेनेकडे आहेत त्यामुळे शिवसेनेने या दोन्ही जागांवरचा आपला क्लेम सोडण्यास नकार दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाल्यानंतर नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असं एकमत झालं होतं.
आश्वासन मिळून देखील उमेदवार जाहीर न करता आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाराज
नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने छगन भुजबळ उमेदवार असतील अशी शक्यता आहे. मात्र जवळपास अमित शहा यांच्यासोबतच्या बैठकीला पंधरा दिवस उलटून देखील अद्याप याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे ठाण्यातून देखील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दबावाला बळी न पडता ठाण्याची जागा भाजपला द्यायला नकार दिला आहे. एकीकडे जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातारची जागा भाजपला सोडायची तयारी दर्शवली आहे. याबदल्यात नाशिक लोकसभेची जागा मिळावी अशी मागणी केली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नाशिकच्या जागेचा आश्वासन मिळून देखील उमेदवार जाहीर करायची परमिशन न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे.
महायुतीमध्ये एकमेकांबाबत दबाव तंत्राचा वापर
जर आश्वासन मिळून देखील जर नाशिकची जागा मिळत नसेल तर सातारा लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे इच्छुक उमेदवार असून या ठिकाणाहून आम्ही सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांची उमेदवारी जाहीर करू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे अद्याप ना सातारचा उमेदवार जाहीर झालाय ना नाशिकचे उमेदवार जाहीर झालाय ना ठाण्याचा उमेदवार जाहीर होऊ शकला. एकंदरीतच महायुतीमध्ये एकमेकांबाबत दबाव तंत्राचा वापर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
हे ही वाचा :