टेंभुर्णी: एका रक्ताच्या कुटुंबातही काही ना काही खळखळ असते आणि एक भाऊ म्हणतो मी जातो बाहेर, हे एका कुटुंबात होते . भाजप तर अनेक कुटुंबांनी अनेक विचारांचे लोक एकत्र येऊन बनलेले कुटुंब आहे . यात इतर कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत आहेत . त्यात एखाद्याची नाराजी असू शकते. पण देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) नावाची जादू आहे ती सर्व नाराजी दूर करेल, असा विश्वास बुधवारी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी टेंभुर्णीत व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस नाराजांना बोलावतात , प्रेमाने समजावतात , भविष्यात त्यांना जे हवे आहे त्याचा शब्द देतात आणि प्रश्न नीट होतात . माझे मोहिते कुटुंबाशी वेगळे नाते आहे. एखाद्या घरात ज्यावेळी नाराजी येते, त्यावेळी एखादा थयथयाट करतो आणि मग घरातील कोणीतरी प्रमुख त्याला शांत करतो. मोहिते कुटुंब अतिशय समजूतदार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बसल्यावर त्यांच्या तक्रारी, म्हणणे संपलेले असेल आणि ते मुख्य प्रवाहात येतील असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
आज टेम्भूर्णी येथे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा बोलावण्यात आला होता . यात खासदार रणजित निंबाळकर , आमदार बबनदादा शिंदे , आमदार संजय मामा शिंदे , माजी आमदार प्रशांत परिचारक , दीपक साळुंखे आणि महायुतीतील विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते . मात्र, या कार्यक्रमात चंद्रकांतदादा यांचे भाषण संपताना एका शेतकऱ्याने केंद्राच्या मंत्र्यांकडून फसवणूक झाल्याची तक्रार केल्याने सभेत गोंधळ झाला आणि ही सभा गुंडाळण्यात आली . यानंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.
माढ्याची जागा भाजप लाखभराच्या मताधिक्याने जिंकेल: चंद्रकांत पाटील
यावेळी निवडणुकीचे वेळापत्रक थोडे लांबले असल्याने प्रयोग करायला जागा आहे, असे सांगत लवकरच इतर उमेदवारांची नावेही बाहेर येतील असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. माढा लोकसभेची जागा 1 लाखापेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येईल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
कोणत्याही निवडणुकीत कोणालाही १०० टक्के मते मिळत नसतात . काही जणांनी कितीही सभा केल्या तरी ते विरोधात असतात, असे सांगत मराठा समाजाचे भले भाजपने केले असे म्हणणारा फार मोठा वर्ग आहे असे सांगितले . तर मराठा समाजाचे अजून तुम्ही भले करायला पाहिजे होते, असे म्हणणारा एक वर्ग आहे . त्या वर्गाला महिनाभरात आम्ही कन्व्हिन्स करू, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला . चांगला कार्यक्रम निवडणुकीच्या काळात बिघडवला जातो , आता तसा एक चांगला प्रयोग झाला, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यावर विरोधक म्हणून शिक्का मारला.
आणखी वाचा
माढ्यात हालचालींना वेग, धैर्यशील मोहिते- पाटील रामराजेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण