(Source: ECI/ABP News/ABP Majha)
देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं; भाई जगताप यांची गंभीर टीका
देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, सध्या त्यांना समोर मुंबई महापालिका, मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडी सरकार दिसतेय : भाई जगताप
मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. सध्या त्यांना सातत्याने डोळ्यासमोर मुंबई महानगर पालिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकार दिसत आहे. त्यामुळे त्यांनी आरोप केला आहे की, महाविकास आघाडीचा अर्थसंकल्प मुंबई महानगर पालिका डोळ्यासमोर ठेवून जाहीर करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात असंच काहीतरी केलं होतं, त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये अशा गोष्टी सातत्याने राहणार. त्यांना माझं सांगण आहे की, नागपूरचा समृद्धी महामार्ग, मंत्रालय, शासकीय इमारती आहेत, त्या महाविकास आघाडी सरकारने केल्या आहेत. असं काहीतरी करावं हे देवेंद्र फडणवीस यांना सुचलं नाही. ते या सरकारने ते करून दाखवलं, असल्याचे सांगत काँग्रेस नेते भाई जगताप यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.
राज्यातील देवस्थानांकडे लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु, फडणवीस सरकारने याकडे लक्ष दिले नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, साडेतीन शक्तिपीठांपैकी एक सप्तश्रृंगी गड असेल अशा सर्व देवस्थानांचा विकास महाविकास आघाडी सरकारने केला आहे. जवळपास तेरा श्रद्धा स्थानांचा विकास महाविकास आघाडी सरकार करत आहे. याकडे फडणवीसांनी कधी लक्ष दिलं नाही. ही सर्व श्रद्धास्थाने महाराष्ट्रभर पसरली आहेत. दुसरी बाब म्हणजे कोविड काळात महाराष्ट्राने दोन पावलं पुढे टाकले आहेत. तब्बल साडे सात हजार कोटी यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रापासून मोठ्या रुग्णालयापर्यंत महाविकास आघाडी सरकारने तयार केली आहेत.
महिलांसाठी महत्वाचा निर्णय फडणवीस यांना या बाबी कधी सुचल्या नाहीत. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त मुंबई महानगरपालिका आहे. महाविकास आघाडी सरकारने मात्र महाराष्ट्रासाठी विकासाचे धोरण अवलंबलं आहे. आपल्याला माहिती असेल फडणीसांच्या काळात शेतकऱ्यांचा एक मोठा संप घडून आला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अनेक दूषणं शेतकऱ्यांना लावली होती. परंतु, महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी भरीव कामगिरी केली आहे. शेतकऱ्यांना 50 टक्केपर्यंतच्या कर्जमाफीची स्कीम देखील आम्ही दिली आहे. गृहिणी महिलांच्या बाबतीत सध्या गंभीर परिस्थिती आहे. आम्ही मात्र यावर काम करत आहोत. महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही महिलांसाठी एक योजना आणली आहे. एखादी महिला प्रॉपर्टी रजिस्टर करत असेल तर त्यासाठी 1% प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याची घोषणा देखील आम्हीच केली आहे. फडणवीसांना अशा कधी गोष्टी सुचल्या नाहीत. त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळे अशा पद्धतीने ते वारंवार वक्तव्य करत आहेत.
पंतप्रधान मोदी आले तरी मुंबई महापालिका निवडणुकीत जागा वाढणार नाही : भाई
मागील दीड वर्षात अनेक भाकीत त्यांनी केली. मात्र, ती खरी ठरली नाहीत. सध्या त्यांना डोळ्यासमोर केवळ महाविकास आघाडी सरकार दिसते. माझं आव्हान आहे, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आमंत्रित केलं तरीदेखील ते त्यांच्या आहे त्या जागा सुद्धा वाचवू शकणार नाहीत. आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे सुप्रीम कोर्टात आज मराठा आरक्षणाविषयी एक बाब समोर आली आहे. केंद्राचे अॅटर्नी जनरल यांनी फडणवीस सरकारने जे मराठा आरक्षण दिलं हे आरक्षण चुकीचं होतं, अशा पद्धतीची माहिती कोर्टात दिली आहे. त्यामुळे मला भाजपच्या त्या वेळीच्या भूमिकेबाबत संशय आहे. कदाचित त्यांनी हे आरक्षण दिलं हे त्यावेळी राजकीय स्वार्थासाठी किंवा आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून तर जाहीर केलं नाही ना अशी शंका आता मनात निर्माण झाली आहे.