Devendra Fadnavis : मुंबईत जे काही चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावरच; देवेंद्र फडणवीसांचा थेट आरोप
Devendra Fadnavis : महाराष्ट्रात जे काही चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर चाललंय, एवढ्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री नाहीत मग ही बैठक टाईमपास आहे का? फडणवीसांचा थेट आरोप

Devendra Fadnavis : भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर आज ठाकरे सरकारने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. तसेच आता भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी देखील बैठकीस उपस्थित राहण्यास नकार दिला आहे, दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी याबाबत पत्रकार परिषद घेत किरीट सोमय्यांवर हल्ला, राणा दाम्पत्य तसेच इतर राजकीय घडामोडींवर ठाकरे सरकारचा समाचार घेतला आहे. काय म्हणाले फडणवीस?
असे हल्ले करून आम्ही घाबरणार नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले भोंगा वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी आम्हाला बैठकीचं निमंत्रण दिलं होतं, पण हिलटरलशाहीमुळे आम्ही या बैठकीवर बहिष्कार घातला आहे. गृहमंत्र्यांना काही अधिकार तरी आहेत का? महाराष्ट्रात जे काही चाललंय ते मुख्यमंत्र्यांच्या निर्देशावर चाललंय, मुंबईतील घटना मुख्यमंत्री कार्यालयाच्या इशाऱ्यानं चालल्या आहेत, तर उर्वरित महाराष्ट्रातील घटना गृहमंत्र्यांच्या इशाऱ्यानं चालल्या आहेत, सरकारने संवादासाठी जागा ठेवली नाही एवढ्या महत्वाच्या बैठकीला मुख्यमंत्री नाहीत मग ही बैठक टाईमपास आहे का? अश्या गृहमंत्र्यांच्या बैठकीला जाऊन फायदा काय? असे फडणवीस यावेळी म्हणाले.
आतापर्यंत महाराष्ट्रात अशी परिस्थिती पाहिली नव्हती
महाराष्ट्रातलं पुरोगामित्व संपलं, ठाकरे सरकारने विरोधी पक्षाला जिवानिशी संपवायचं ठरवलंय. जिथे गुन्हा नोंद करायला ही संघर्ष करावा लागत आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात अशी परिस्थिती पाहिली नव्हती. त्यांना लोकशाही मान्य नाही, त्यांनी आमच्या पोलखोल सभांवर हल्ला केला, असे हल्ले करून आम्ही घाबरणार नाही हे लक्षात ठेवावं. कायदा सुरक्षेची जबाबदारी ही सरकारची आहे, सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशाचे पालन झालेच पाहिजे, झेड सेक्युरिटीमध्ये आमच्या नेत्यांना मारण्याचा प्रयत्न झालाय, म्हणजेच पोलीस संरक्षणात देखील भाजप नेत्यावर हल्ला करण्यात आल्याचा थेट आरोप फडणवीसांनी ठाकरे सरकारवर केला आहे. तसेच आता संघर्षाशिवाय पर्याय नाही असे फडणवीस म्हणाले.
कोण सहभागी होईल?
आज ठाकरे सरकारने धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक तत्त्वे ठरवण्यासाठी सर्व पक्षांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी या बैठकीबाबत आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीला भारतीय जनता पक्षाकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत, तर मनसेकडून नांदगावकर आणि संदीप देशपांडे या बैठकीला सहभागी होणार असल्याची माहिती आहे. याशिवाय अन्य काही लहान पक्षांचे नेतेही तेथे उपस्थित राहणार आहेत.



















