जालना विधानसभेच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? दानवे -खोतकर पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता
Jalna News : जालना विधानसभेच्या जागेवरून खोतकर आणि दानवे पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. परंपरेप्रमाणे महायुतीमध्ये शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या जागेवरती आता भाजपकडून दावा केला जातोय.
Jalna News जालना : जालना विधानसभेच्या (Jalna Vidhan Sabha Election 2024) जागेवरून खोतकरआणि दानवे (Arjun Khotkar vs Raosaheb Danve) पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. परंपरेप्रमाणे महायुतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या या जागेवरती आता भाजपकडून दावा केला जातोय. तर माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे बंधू भास्कर दानवे यांनी जालन्याची जागा भाजपला सुटावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्यास म्हटलंय. शिवाय उमेदवारी दिलीच तर कोणी नाही म्हणणार? असं म्हणत जालन्याच्या जागेवरती त्यांनीही आता शड्डू ठोकला आहे. त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा नेमकी कोणाच्या वाट्याला येते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, परंपरेने ही जागा महायुतीमध्ये शिवसेनेकडे येत असल्याने भाजपच्या या दाव्यावरती शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांनी उपरोधिक टोला मारलाय, रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे आमदार असलेल्या भोकरदन आणि भाजपच्या ताब्यातील बदनापूरच्या जागा दिल्यावर आपण जालन्याची जागा त्यांना सोडून देऊ, असंही त्यांनी म्हंटलय.
महायुतीत भाजपने 170 ते 180 जागा लढण्याचा नेत्यांचा आग्रह
लोकसभेच्या निवडणुकीत बसलेला फटका लक्षात घेता विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने जास्तीत जास्त म्हणजे 170 ते 180 जागा लढाव्यात, असा आग्रह पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून विधानसभेसाठी 100 जागांची मागणी भाजपकडे केली होती. मात्र शिंदे गटाची ही मागणी मान्य केली तर 2019 पेक्षा कमी जागा भाजपला लढाव्या लागतील. त्यामुळे 170 ते 180 जागांपेक्षा कमी जागांवर भाजपने लढू नये, असा आग्रह स्थानिक भाजप नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. जेवढ्या जास्त जागा लढू तेवढा आधिक फायदा होईल, असे मत भाजपच्या नेत्यांचे आहे.
लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवेंचा पराभव
जालना लोकसभा मतदारसंघात 5 वेळेस लोकसभेवर निवडून गेलेल्या रावसाहेब दानवेंना 2024 लोकसभा निवडणुकीत मात्र पराभव स्वीकारावा लागला. पाचवेळा खासदार असलेले आणि केंद्रात रेल्वे राज्यमंत्री म्हणून काम केलेल्या रावसाहेब दानवेंना (Raosaheb Danve) सगळ्यात मोठा राजकीय पराभव स्वीकारावा लागला. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 30 हजार मतांनी निवडून आलेले रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) 2024 च्या निवडणुकीत सुमारे 1 लाख मतांच्या फरकाने पराभूत झाले. रावसाहेब दानवेंचा पराभव झाल्यानंतर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनीही आनंद व्यक्त केला होता. त्यानंतर अर्जुन खोतकर यांनीही नाव न घेता टीका केली होती.अशातच आता जालना विधानसभेच्या जागेवरून दानवे -खोतकर पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता असून ही जागा नक्की कुणाच्या वाट्याला येते हे पाहणे खऱ्या अर्थाने महत्वाचे ठरणार आहे.
हे ही वाचा