Bharat Gogawale : अजित पवार मुख्यमंत्री होणं शक्य नाही, कारण आमचं ठरलंय; भरत गोगावले यांचं मोठं वक्तव्य
Bharat Gogawale On Ajit Pawar : अजित पवार यांना आत्ता मुख्यमंत्री होणं शक्य नसल्याचं भरत गोगावले यांनी म्हटले आहे.
Bharat Gogawale On Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) भाजपसोबत जाणार असून, मुख्यमंत्री होण्याची चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असतील तर विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. दरम्यान यावरच प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी मोठा दावा केला आहे. "अजित पवार म्हणत आहे की, आता जर मुख्यमंत्री झालो तर बरं होईल. पण आता तसं शक्य नाही. कारण जे आमचं ठरलं आहे ते ठरलं..त्याच्यात आता बदल नाही," असं गोगावले म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरून वेगवेगळ्या चर्चा आहे. अजित पवार भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे. त्यातच आपल्याला मुख्यमंत्री होण्यास आवडेल आणि त्यासाठी 2024 गरज नाही असे वक्तव्य खुद्द अजित पवार यांनी केले आहे. मात्र यावरुन अनेक प्रतिक्रिया येत असताना अजित पवार यांना आता मुख्यमंत्री होणं शक्य नसल्याचं भरत गोगावले यांनी म्हटले आहे. विशेष आमचं ठरलं असून, त्यात काही बदल होणार नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, अजित पवार राष्ट्रवादीचा गट घेऊन सत्तेत आल्यास आम्ही सत्तेतून बाहेर पडू असे वक्तव्य शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केले होते.
विखे पाटलांना प्रत्युत्तर...
देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं वक्तव्य भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "बऱ्याच लोकांच्या मनात वेगवेगळ असते. पण जो कार्यरत असतो तोच खरा मुख्यमंत्री असतो. अजित पवार देखील म्हणाले की, मी मुख्यमंत्री व्हावं असं माझ्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. पण युतीमध्ये जे काही ठरलेलं आहे ते ठरलेलं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पक्षाच्या पद्धतीने बोलणारच, पण त्याला काही हरकत नाही. त्यावर आम्ही काही बोलत नाही. त्यांनी त्याचं काम करावे आम्ही आमचं काम करतोय," असेही भरत गोगावले म्हणाले.
जळगावच्या सभेवरुन वातावरण तापलं...
जळगाव येथील पाचोऱ्यात आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा होत आहे. दरम्यान या सभेवरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी उद्धव ठाकरेंची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. तर सभेत आल्यावर परत जातील का? असे प्रत्युत्तर ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे. दरम्यान सभेपूर्वी दोन्ही गटातील नेत्यांकडून एकमेकांवर आरोप देखील होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सभेआधीच जळगाव जिल्ह्यातील राजकारण तापत आहे. तर आपल्या सभेतून उद्धव ठाकरे कोणावर निशाणा साधणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: