Sanjay Shirsat: 'तर त्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे'; संजय शिरसाटांचे वक्तव्य
Sanjay Shirsat: बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी करण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचं म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे.
Sanjay Shirsat On Aaditya Thackeray: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज जयंती असल्याने सर्वत्र त्यांची जयंती साजरी केली जात आहे. मात्र याचवेळी बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केलेल्या एका टीकेला उत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी खोचक शब्दात उत्तर दिले आहे. "बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी करण्याचा आम्हाला अधिकार नसल्याचं म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे" असे वक्तव्य शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यावरून नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज औरंगाबादमध्ये आज शिंदे गटाकडून मोटरसायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले की, शिवसेनाप्रमुख हे महाराष्ट्राचे नाही तर देशाचे दैवत आहे. त्यांनी आम्हाला मोठे केलं, लाखो शिवसैनिक कामाला लावले आणि आज अशा शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी करण्याचा आम्हाला अधिकार नाही असे म्हणणाऱ्यांच्या थोबाडीत मारली पाहिजे असे शिरसाट म्हणाले.
भुमरेंची टीका
गद्दारांच्या हाताने तैलचित्राच्या अनावरून माझ्या आजोबांना दुःख होत असेल असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाचे मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी देखील खोचक टीका केली आहे. "माझा पुत्र अडीच वर्ष मुख्यमंत्री होता. असे असताना अडीच वर्षे आपल्या वडिलांचे किंवा आजोबांचे चित्र लावावे हे सुचलं नाही. पण ते काम एका शिवसैनिक असलेल्या एकनाथ शिंदे यांनी केलं, म्हणून बाळासाहेबांना दुःख होत असेल"अशी खोचक प्रतिक्रिया संदिपान भुमरे यांनी दिली आहे. तर सध्याचे रक्ताचे वारसदार हे बाळासाहेब होऊ पाहत असून, ते कधीच बाळासाहेब ठाकरे होणार नाहीत अशीही टीका भुमरे यांनी केलीय.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
औरंगाबादच्या वाळूज परिसरातील रांजणगाव येथे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं उदघाटन आदित्य ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले होते की, "बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण एका घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होत आहे. पण 'माझे आजोबाही विचार करतील की, गद्दारांच्या हस्ते माझ्या तैलचित्रांचं अनावरण होत आहे”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या: