Abdul Sattar News: अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चेवर शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार यांची प्रतिक्रिया आली आहे. अजित पवार (Ajit Pawar) खरच भाजपसोबत (BJP) येणार का? याबाबत शरद पवार (Sharad Pawa) यांना विचारलं पाहिजे. याबाबत ते सत्य काय ते सांगू शकतात. अजित पवार यांच्या मनात काय सुरु आहे, शरद पवार यांचं काय सुरु आहे आणि राष्ट्रवादी पक्षात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची परिस्थिती का निर्माण झाली आहे. या परिस्थितीची कारण काय आहे? ,पण एकनाथ शिंदे सांगितल त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेणार आहोत. तसेच पुढील पाच वर्षे एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
आमच्यासोबत त्यांनी यावे की नाही तो त्यांचा प्रश्न आहे. अशी परिस्थिती जेव्हा-जेव्हा निर्माण होते, त्यावेळी वेगवेगळी परिस्थिती असते. जसा आम्ही उठाव केला त्यामागील पार्श्वभूमीवर वेगळी होती. आत्ताची पार्श्वभूमीवर मात्र वेगळी आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष सोडून अजित पवार भाजपमध्ये जाण्याचे काय कारण असू शकतात हे मी सांगण्यापेक्षा अजित पवार आणि शरद पवार अधिक सांगू शकतात, असेही अब्दुल सत्तार म्हणाले.
अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीत
अजित पवार शिंदे गटाला चालतील का? या प्रश्नाला उत्तर देताना अब्दुल सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत निर्णय घेतील. त्यांना जे लोकं चालतील ते आम्हाला देखील चालतील. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांना जो व्यक्ती चालणार नाही तो आम्हाला देखील चालणार नसल्याचे अब्दुल सत्तार म्हणाले आहे. तर आमचा सर्वांचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. तर अजित पवार यांच्याबद्दल अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार दिल्लीत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शहा यांच्यासह जे.पी नड्डा यांना आहे. पण एकनाथ शिंदे जे काही निर्णय घेतील ते आमच्यासाठी अंतिम राहील. आमच्या 40 आमदारांचा आणि लाखो कार्यकर्त्यांचे मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विश्वास असून, त्यांचा विचार करून शिंदे निर्णय घेतील. तसेच जे काही होईल त्यानंतर देखील एकनाथ शिंदे हेच पुढील पाच वर्षे मुख्यमंत्री राहतील असा विश्वास देखील अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे.
शरद पवारांची प्रतिक्रिया...
अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. दरम्यान यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "ही चर्चा केवळ तुमच्या मनात आहे, आमच्या कोणाच्याही मनात नाही. या चर्चांना अजिबात महत्त्व नाही," असे शरद पवार म्हणाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे सर्व सहकारी सध्या पक्षाला शक्तिशाली कसं करायचं यासाठी प्रयत्न करत आहेत. तसेच अजित पवारांनी कोणतीही बैठक बोलावलेली नाही, असेही शरद पवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: