Ajit Pawar News : महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या अजित पवार (Ajit Pawar) केंद्र बिंदू ठरले आहेत. ते भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची वारंवार चर्चा होत आहे. परंतु नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत, त्यात काही तथ्य नाही, अशी माहिती अजित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.


दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. 'द न्यू इंडियन एक्स्प्रेस' या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. परंतु अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. मी पुन्हा पुन्हा
प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे, असं अजित पवार म्हणाले.


शरद पवारांच्या मनात काय?


यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. 2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही. म्हणूनच, अजित पवार यांच्यासोबतच शरद पवारांच्याही मनात नेमकं काय आहे, याबाबत आता जोरदार चर्चा रंगू लागल्या आहेत.


अजित पवारांनी आमदारांची बैठक बोलावली नाही, आम्हीच मुंबईत आलो : अण्णा बनसोडे


दरम्यान, अजित पवार हे विधीमंडळातील आपल्या कार्यलयात पोहोचले आहेत. इथे ते गाठीभेटी घेणार असल्याची माहिती आहे. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादीच अनेक आमदार मुंबईत दाखल झाले आहेत. काही वेळातच ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत. अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली नसून आम्ही आमदारच एकत्र भेटणार आहोत, अशी माहिती आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. तसंच दादा जिथे जातील तिथे अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत असेल, असंही बनसोडे यांनी सांगितलं. 


जयंत पाटील काय म्हणाले? 


याबाबत एबीपी माझाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारलं असता आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.


दरम्यान, गेल्या आठवड्यातही अजित पवार यांनी काही कार्यक्रम रद्द केले होते. तेव्हापासून अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. रोखठोकमध्येही खुद्द शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत पक्षांतरासाठी दबाव आहे, असं स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं. आता अजित पवार यांनी नव्या समीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत.