Bhagwat Karad On Ajit Pawar : राज्याच्या राजकारणात विरोधी पक्षनेते सध्या अजित पवार (Ajit Pawar) याची सर्वाधिक चर्चा असून, अजित पवार हे भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याची वारंवार बोलले जात आहे. विशेष म्हणजे अजित पवार सतत त्यावर खुलासा देखील करत आहेत. पण राज्यात घडत असलेल्या घडामोडी पाहता अजित पवार नाराज असून, ते भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा काही थांबता थांबत नसल्याचे चित्र आहे. मात्र अशातच आता भाजप नेते तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. केवळ राष्ट्रवादीच नव्हे तर काँग्रेसच्या बहुतांश आमदारांमध्येही प्रचंड अस्वस्थता असल्याचा दावा कराड यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले भागवत कराड...


दरम्यान अजित पवारांबद्दल सुरु असलेल्या चर्चेवर बोलताना कराड म्हणाले की, 'फक्त अजित पवारच नाही, तर जशी राष्ट्रवादी पक्षात अस्वस्थता आहे. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये देखील अशीच काही परिस्थिती आहे. सोबतच ठाकरे गटात जे काही 15 आमदार शिल्लक राहिले आहेत, त्यांच्यामध्ये देखील अस्वस्थता आहे. कारण एकमेकांचा संगोपन नाही, यांचे विचार एक नाही. सोबतच प्रत्येक आमदाराला वाटते की, आपली कामे झाली पाहिजे. त्यामुळे अजित पवारांसह काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या आमदारांमध्ये देखील अस्वस्थता  आहे. 


गेल्या आठवड्यात अजित पवारांनी काही कार्यक्रम रद्द केले आणि ते नॉट रिचेबल असल्याची चर्चा सुरु झाली होती. तेव्हापासून अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या अशा चर्चा सुरु होत्या. अशातच सोमवारीही देखील अजित पवारांचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची चर्चा होती. सोबतच  अजित पवारांनी काही आमदारांची बैठक बोलावल्याचीही जोरदार चर्चा झाली. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सतत सुरु आहे. त्यातच दिल्लीत भाजपची महत्वाची बैठक होत असल्याची चर्चा आहे. 


अजित पवारांचा खुलासा... 


या सर्व चर्चेबाबत अजित पवार यांनी ट्वीट करत खुलासा केला आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की,“खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्री सदस्यांच्या कुटुंबियांना व उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्री सदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी मी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता. मी मुंबईतच आहे. मंगळवारी 18 एप्रिल रोजी मी विधानभवनातील माझ्या कार्यालयात उपस्थित राहणार असून, कार्यालयाचे नियमित कामकाज सुरु राहणार आहे. मंगळवारी मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध होत आहेत, त्या पूर्णत: असत्य आहेत. मी आमदार अथवा पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली नाही, याची नोंद घ्यावी.”


इतर महत्वाच्या बातम्या: 


Ajit Pawar: अजित पवारांचे पुण्यातील नियोजित दौरे रद्द, भाजपत जाण्याच्या चर्चांना वेग; मात्र कोणतेही नियोजित कार्यक्रम नव्हते, दादांचं स्पष्टीकरण