MVA Seat Sharing : तुमच्यासह किंवा तुमच्याविना! संध्याकाळ 7 वाजेपर्यत निर्णय सांगा, अन्यथा आमचं जागावाटप ठरलंय; मविआचा प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम
Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडे जागावाटपाचे दोन फॉर्म्युले तयार असून प्रकाश आंबेडकर सोबत आले नाहीत तर त्यांच्याविना निवडणूक लढवली जाणार असल्याची माहिती आहे.
मुंबई: लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा ((MVA Seat Sharing) ) अद्याप सुटल्याचं दिसत नाही. वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) ताणलेल्या भूमिकेमुळे जागावाटपावर अंतिम निर्णय होत नसल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. प्रकाश आंबेडकर जर सोबत आले तर त्यांना किती जागा द्यायच्या हे ठरल्या आहेत. तर ते सोबत आले नाहीत तर त्यांच्याविना महाविकास आघाडीचे जागावाटप ठरल्याची माहितीही समोर येत आहे. त्यामुळे आज, मंगळवार संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचा काय तो निर्णय द्या, अन्यथा आम्ही आमचं वेगळं लढू असा अल्टिमेटम आता महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांना दिल्याची माहिती समोर येत आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटपाचे दोन फॉर्म्युले तयार
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे जागावाटपाच्या फॉर्म्युलाचे दोन पर्याय तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ऐनवेळी महाविकास आघाडीत आली नाही, तर महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला 22-16-10 असा राहिल. त्यानुसार ठाकरे गट 22, काँग्रेस 16 आणि शरद पवारांची राष्ट्रवादी दहा जागांवर लढण्याची शक्यता आहे.
वंचित महाविकास आघाडीत दाखल झाल्यास, 20-15-9-4 हा जागावाटपाचा फॉर्म्युला राहील. त्या परिस्थिती ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला नऊ आणि वंचितला चार जागा देण्यात येतील. वंचितला ठाकरे गटाच्या कोट्यातून दोन, काँग्रेसच्या कोट्यातून एक आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोट्यातून एक जागा देण्याची तयारी आहे. त्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेकडे आता मविआचं लक्ष आहे.
हातकणंगल्यात राजू शेट्टींना पाठिंबा
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांच्या शेतकरी स्वाभिमानी पक्षाला मविआ बाहेरून पाठिंबा देणार आहे. तसंच सांगलीची जागा ठाकरे गटाला, तर रामटेक आणि जालनाची जागा काँग्रेस पक्षाला मिळणार असल्याची चर्चा आहे. माढा लोकसभा मतदारसंघाची जागा ही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महादेव जानकरांच्या रासपला देण्यात येणार असल्याचं बोललं जातंय.
चार जागांचा वंचितला प्रस्ताव
महाविकास आघाडीने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. त्या आधी झालेल्या मुंबईतील राहुल गांधींच्या सभेला वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी उपस्थिती लावल्यामुळे ते महाविकास आघाडीसोबत असणार हे स्पष्ट झालं होतं. पण वंचितने अद्यापही आपला निर्णय गुलदस्त्यात ठेवला आहे.
ही बातमी वाचा: