मुंबई : महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतून 27 जुलै रोजी 11 आमदार निवृत्त होणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांच्या मतदानाद्वारे या आमदारांची परिषदेवर निवड झाली होती. केंद्रीय निवडणूक आयोगनं या 11 जागांच्या निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला आहे.  विधानसभेतील संख्या बळानुसार सध्या महायुतीचे 9 तर मविआचे 2 उमेदवार विजयी होऊ शकतात. काँग्रेसला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांच्या मतांमधून एक उमेदवार विजयी होऊ शकतो. काँग्रेस नेमकं कुणाला संधी देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विधानसभा निवडणुकीसंदर्भात रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीतील बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीची उमेदवारी कुणाला मिळणार याबाबत देखील चर्चा होऊ शकते. काँग्रेसच्या काही नेत्यांची नावं देखील चर्चेत आहेत.



काँग्रेस कुणाला संधी देणार?


डॉ. वजाहत मिर्झा आणि डॉ. प्रज्ञा सातव  हे दोन्ही आमदार निवृत्त होत आहेत. दोघांना देखील पुन्हा संधी मिळेल अशी आशा आहे. याशिवाय काँग्रेसचे वरिष्ठ नेते नसीम खान, मुझफ्पर हुसैन, संध्या सव्वालाखे, भिवंडीतील काँग्रेसचे नेते दयानंद चोरगे सूरज ठाकूर यांची नावं चर्चेत असल्याचं वृत्त इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी दैनिकानं दिलं आहे. काँग्रेसनं यापूर्वी झालेल्या राज्यसभा निवडणुकीत इमरान प्रतापगढी आणि चंद्रकांत हंडोरे यांना संधी दिली होती. त्यामुळं काँग्रेस यावेळी कोणाला संधी देणार हे देखील पाहावं लागेल.


विधानपरिषदेतून कोणते आमदार निवृत्त होणार?


भाजपचे  विजय गिरकर, निलय नाईक, रमेश पाटील, रामराव पाटील, रासपचे महादेव जानकर, शिवसेना ठाकरे गटाचे अनिल परब, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या मनीषा कायंदे, काँग्रेसच्या डॉ. वजाहत मिर्झा आणि डॉ. प्रज्ञा सातव,राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुराणी आणि शेकापचे जयंत पाटील निवृत्त होत आहेत. या 11 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या नियोजनाप्रमाणं 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी होणार आहे. 


विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार महायुतीच्या 9 जागा निवडून येतील. तर, महाविकास आघाडीचे दोन आमदार विजयी होऊ शकतात. यापैकी एक जागा काँग्रेसची असेल तर दुसऱ्या जागेवर मविआकडून शेकापच्या जयंत पाटील यांना संधी दिली जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, काँग्रेसकडून कुणाला संधी दिली जाणार हे पाहावं लागणार आहे.  


दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या जागा देखील रिक्त आहेत. त्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.


विधानपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम


अधिसूचना जारी होणार : 25 जून 2024
अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत : 2  जुलै
अर्जांची छाननी : 3 जुलै
अर्ज मागं घेण्याची तारीख : 5 जुलै 
मतदानाची तारीख : 12 जुलै  (9  ते 4 वाजेपर्यंत )
मतमोजणी : 12 जुलै  सायंकाळी 5 नंतर 


इतर बातम्या :