पुणे: गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यात ड्रग्ज सापडल्याच्या मुद्यावरुन विरोधकांनी सरकारविरोधात रान उठवले आहे. काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांनी ड्रग्ज प्रकरणावरुन (Pune Drugs Case) उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी आणि मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हे एकूण प्रकरण महायुती सरकारसाठी अडचणीचे ठरत असताना युतीमध्ये समन्वय नसल्याची बाब समोर आली आहे. कारण, या परिस्थितीमध्येही अजित पवार (Ajit Pawar) आणि चंद्रकांत पाटील यांच्यात पुण्याच्या पालकमंत्रीपदावरुन सुरु असलेले कोल्ड वार कायम आहे. पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा कारभार सध्या अजित पवार यांच्याकडे आहे. मात्र, ड्रग्ज प्रकरणावरुन भाजपच्या चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा 'मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही', असे सांगून ते मोकळे झाले होते.
चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यामुळे अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी चांगलेच संतापले होते. त्यांनी पलटवार करताना चंद्रकांत पाटील यांच्यावरच गंभीर आरोप केले होते. चंद्रकांत दादा पुण्याचे पालकमंत्री असताना ड्रग्जसासारख्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत कारण त्यांच्या आशीर्वादाने हे सर्व काही पुण्यात व्यवस्थित सुरू होते. अजितदादा पालकमंत्री झाल्यामुळे ह्या सर्व चिंताजनक घटना आज उघड झाल्या म्हणुन चंद्रकांत दादा व्यथीत आहेत, असे मिटकरी यांनी म्हटले होते.
अमोल मिटकरी यांच्या या वक्तव्याबद्दल भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अमोल मिटकरी यांनी तोंडाला आवर घालण्याची गरज आहे. पक्षाने त्यांच्याकडे पाहावे, त्यांना काय अधिकार आहेत? अमोल मिटकरी बाष्कळ बडबड करतात. मागच्या एका प्रकरणात त्यांना समज देण्याची गरज आहे. महायुतीला तडा जाईल, असे वक्तव्य त्यांनी करु नये. आपण एखादी गोष्ट बोलून जाता, ती महायुतीसाठी हानीकारक ठरते, असे प्रवीण दरेकर यांनी म्हटले होते.
गृहमंत्री झोपा काढत आहेत का? पुणं भकास व्हायला वेळ लागणार नाही; रोहित पवारांची टीका
‘मी पालकमंत्री असताना पुण्यात अशा घटना घडल्याच नाही’ असं सांगणाऱ्या चंद्रकांतदादा पाटील यांनी हे लक्षात घ्यायला हवं की, तुम्ही पालकमंत्री असताना जानेवारी ते मे २०२३ या अवघ्या पाच महिन्यात राज्यात तब्बल ७ हजार कोटींचे ड्रग्स सापडलं आणि विशेष म्हणजे त्यात देशात कुठंही उपलब्ध न होणाऱ्या कॅथा_इडूलीस या ड्रग्सचाही समावेश आहे.आपल्या पालकमंत्री पदाच्या काळात अमली पदार्थांच्या व्यापाराची पुण्यात जी पेरणी झाली त्याचंच पीक आज बहरत असून सांस्कृतिक पुणे हे पूर्णपणे #उडते_पुणे झाले आहे.
पुणे शहरात दररोज कोट्यवधींचा अमली पदार्थांचा व्यापार होत असताना राज्याचे गृहमंत्री काय झोपा काढत आहेत का? अधिवेशनात गृहमंत्र्यांना लक्षवेधीच्या माध्यमातून मी पुण्यातील वाढत्या ड्रग्सचा मुद्दा समोर आणला होता, पण तेंव्हा फडणवीस साहेबांनी गोलगोल उत्तरं देऊन टाळाटाळ केली होती.
सुपरफास्ट_देवाभाऊ किमान संवेदनशील विषयांवर तरी serious व्हा… आजी-माजी पालकमंत्री, गृहमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे. पक्षविस्तारासाठी गुंडांना संरक्षण देणं थांबवा.. अन्यथा या सांस्कृतिक शहरासह हा महाराष्ट्र भकास व्हायला वेळ लागणार नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले होते.
आणखी वाचा