मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून राज्यात महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) विरुद्ध महायुती संघर्ष सुरु झाल्याचं दिसतंय. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, पण जागावाटपाचा प्रश्न मात्र अद्यापही सुटलेला नाही. महाविकास आघाडीत अजूनही चार ते पाच जागांवर अद्याप घोळ कायम आहे. त्यातील तीन जागांचा वाद तर टोकाचा असून तो वाद आता दिल्लीमध्येच सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


महाविकास आघाडीत कोणत्या जागांवर घोळ? 


महाविकास आघाडीमध्ये ज्या जागांवरून घोळ सुरू आहे त्यातील पहिली जागा आहे ती सांगलीची.सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटानं चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पण याच जागेवर काँग्रेसचे विशाल पाटीलही इच्छुक आहेत. 


दुसरी जागा आहे भिवंडीची. भिवंडी हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ आहे. मात्र यावेळी या जागेवर शरद पवार गटाने दावा केला. काँग्रेसकडून दयानंद चोरगे आणि शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे यांच्यामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं दिसतंय. 


रामटेकच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात संघर्ष सुरू आहे. रामटेकच्या जागेवर काँग्रेसकडून नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांच्या नावाचीही चर्चा आहे. पण या मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटानंही दावा सांगितला आहे. 


दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवरुनही काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात रस्सीखेच सुरु आहे. काँग्रेसकडून वर्षा गायकवाड यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अनिल देसाई यांचं नाव चर्चेत आहे. 


पाच जागांवर वाद असल्याचा प्रकाश आंबेडकरांचा दावा


महाविकास आघाडीमध्ये पाच जागांवर वाद असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. आधीच त्यांच्यात वाद, मग आम्ही त्यांच्यात जाऊन काय करू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती. तर महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचं अंतिम झालं असून कोणत्याही जागेवरून वाद नसल्याचा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. 


दिल्लीच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता


महाविकास आघाडी आणि महायुती एकमेकांच्या उमेदवारांच्या यादीची वाट पाहत आहे. तर दुसरीकडे मात्र महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा  सुटलेला नाही. सांगली, भिवंडी आणि रामटेक या तीन जागांचा वाद आता टोकाला गेलेला आहे. त्यामुळे दिल्लीकरांच्या मध्यस्थीनंतरच हा वाद सुटणार आहे. त्यामुळे या तीन जागा कुठल्या पक्षाला सुटणार आणि महाविकास आघाडीत काय समीकरण ठरतात हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे.


ही बातमी वाचा: