Madha LokSabha constituency : माढा लोकसभा मतदारसंघातून रासपचे नेते महादेव जानकर यांना त्यांच्या कोट्यातून उमेदवारी द्यावी, अशा चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये रंगू लागल्या होत्या. महादेव जानकर यांना ही जागा दिली तर बारामती आणि माढा दोन्ही मतदारसंघात धनगर समाजाचा पाठिंबा मिळेल, असा विचार शरद पवार गटाने सुरु केला होता. मात्र, महादेव जानकर थेट महायुतीच्या बैठकीत पोहोचले. महायुतीने त्यांना लोकसभेची 1 जागा जाहीर केली. शिवाय जानकर यांनीही महायुतीमध्येच राहणार असे स्पष्ट केले. त्यामुळे शरद पवारांनी टाकलेला डाव महायुतीकडून उलटवण्यात आलाय.
शरद पवार आता माढात शेवटचा पत्ता टाकणार ?
महायुतीमध्ये माढाची जागा भाजपच्या वाट्याला आहे. माढातून भाजपने विद्यमान खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली असली तरीही माढा लोकसभा मतदारसंघात मोहिती पाटलांचीही ताकद आहे. निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केल्याने मोहिते पाटलांचा गट नाराज असल्याचेही व्हिडीओ समोर आले होते. धैर्यशील मोहिते पाटील लोकसभा लढवण्यास इच्छुक असल्याचेही समोर आले होते. समोरील पक्षातून महत्वकांक्षी नाराज उमेदवार आपल्याकडे घेण्यात शरद पवार चतूर आहेत. जानकर महायुतीत गेल्यानंतर शरद पवार मोहिते पाटलांच्या रुपाने शेवटचा पत्ता टाकू शकतात.
मोहिते पाटलांशी असलेले जुने संबंध कामी येणार ?
राज्याच्या राजकारणात गेल्या 3 वर्षात अनेकदा उलथापालथ झाली आहे. भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जायचे. मात्र, 2019 मध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, तरिही शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचे ऋणानुबंध कमी झालेले नाहीत. काही महिन्यांपूर्वी प्रकृतीची चौकशी करण्यासाठी शरद पवार थेट मोहिते पाटील यांच्या निवासस्थानी गेले होते. त्यामुळे शरद पवार यांचे जुने संबंध आगामी लोकसभा निवडणुकीत कामी येणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.
तुतारी हाती घ्या, मोहिते पाटलांचे कार्यकर्ते आक्रमक
भाजप मोहिते पाटील घरण्याला संपवू पाहत आहे. शिवाय राज्यात भाजपच्या विरोधात वातावरण आहे. तुम्ही शांत राहिलात तर तुमचे नेतृत्व तालुक्यापुरते मर्यादित ठेवतील. त्यामुळे भाजप सोडा तुतारी हाती घ्या, अशा घोषणाच्या मोहिते पाटलांच्या कार्यकर्त्यांनी बैठकीत दिल्या आहेत. दरम्यान, लोकभावना जाणून घेऊनच राजकीय निर्णय घेणार, असं धैर्यशील मोहिते पाटील यांनी जाहिर केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महादेव जानकर महायुतीमध्ये राहणार, रासपला 1 जागा सोडणार, सुनील तटकरेंची मोठी घोषणा