बीड : पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी दाखल होत धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) कुटुंबीयांची भेट घेतली आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकमेकांचे राजकीय विरोधक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर त्यांचा राष्ट्रवादी हा पक्ष महायुतीचा (Mahayuti) भाग झाला. तेव्हापासून एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले हे भाऊ-बहीण राजकारणाच्या दृष्टीने एकमेकांचे मित्र झाले आहेत. सध्या संपूर्ण राज्यात प्रचाराची धूम आहे. पंकजा मुंडेदेखील (Pankaja Munde) बीडमध्ये (Beed) जोमात प्रचार करत आहेत. याच प्रचारादरम्यान त्यांनी धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी जात त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. 


पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकत्र गोपीनाथ गडावर


याआधी पंकजा मुंडे यांचे राजकीय विरोधक असलेले धनंजय मुंडे आता मात्र पंकजा यांचा जोमाने प्रचार करताना दिसतायत. पंकजा मुंडे यांनी आज गोपीनाथगडाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पांगरी या भागात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यांच्या सोबतीला धनंजय मुंडे हेदेखील होते. पांगरी परिसरात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे बॅनर्स लावलेले होते. या भाऊ-बहिणीने गोपीनाथ गडाचे सोबतच दर्शन घेतले. 


बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा 


मराठा आरक्षणाच्या मागणीमुळे मराठा समाजाची झालेली एकजूट लक्षात घेता बीड जिल्ह्यातून महाविकास आघाडीकडून मराठा समाजाचा उमेदवार देण्यावर विचार केला जात आहे. या जागेसाठी दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांना तिकीट देण्याचा विचार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून केला जातोय. यावरही पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. मी कधीही जात पाहात नाही. मी समोरच्या उमेदवाराला फक्त एक प्रतिस्पर्धी म्हणून पाहते, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 


मनोज जरांगे, मराठा समाजाच्या भूमिकेवर प्रतिक्रिया


दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी उभ्या केलेल्या आंदोलनामुळे मराठा मतदारांना चांगलेच महत्त्व आले आहे. बीड जिल्ह्यात मराठा मतदारांचे प्रमाण लक्षणीय असल्यामुळे पंकजा मुंडे  सावध पवित्रा घेताना दिसतायत. मनोज जरांगे यांनी आज प्रत्येक मतदारसंघात मराठा समाजाचा एक उमेदवार अपक्ष म्हणून उभा केला जाईल, असे सांगितले. त्यानंतर मराठा मते फुटण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. मनोज जरंगे पाटील यांनी घेतलेली भूमिका ही स्वागतार्ह असून यापूर्वीही त्यांनीमी कोणत्याही राजकीय पक्षासोबत उभा राहणार नाही हे सांगितले होते. शेवटी निवडणुकीमध्ये त्यांनी अपक्ष उमेदवार किंवा न द्यावे, हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. 


हेही वाचा>>


Baramait Crime News : धक्कादायक! बारामतीत भर चौकात तरुणाला बेदम मारहाण, बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल केलं, पण शेवटी मृत्यू


Bacchu Kadu On Amravati: भाजपचा नेता गळाला की ठाकरेंचा पळविला, बच्चू कडू अमरावतीतून कोणाला उतरवणार? नवी माहिती समोर