माढ्यात नवा ट्विस्ट, शरद पवारांना धक्का बसण्याची शक्यता; फडणवीसांच्या शिलेदाराने घेतली डोळस यांची भेट
धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, गेल्या 30 वर्षांचं वैर विसरुन उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला.
सोलापूर : राज्यातील माढा लोकसभा (Madha Loksabha) मतदारसंघात सुरुवातीपासूनच अनेक धक्के बसताना पाहायला मिळत आहे. भाजपाने रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांना माढा लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर, अकलूजमधील मोहिते पाटील कुटुंबीयांनी बंडाची तयारी केली होती. अखेर शरद पवारांनी (Sharad Pawar) पहिला डाव यशस्वी करुन दाखवला आणि माढा लोकसभा मतदारसंघात रंगतदार चुरस निर्माण झाली. धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे, भाजपासोबत असलेलं मोहिते पाटील कुटुंब थेट भाजपाविरुद्ध शड्डू ठोकून लोकसभेच्या मैदानात उतरलं. त्यानंतर, एक-एक मोहरे सोबत घेण्याचं कामही शरद पवारांच्या नेतृत्वात सुरू झालं. त्यामध्ये, नागपूर येथे जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेल्या उत्तम जानकरांनी थेट मोहिते पाटलांशी मैत्री केली. त्यानंतरही, असेच एकेक ट्विस्ट माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहेत.
धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, गेल्या 30 वर्षांचं वैर विसरुन उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांना आपला पाठिंबा जाहीर केला. विशेष म्हणजे आपल्या भाषणात जानकरांनी अजित पवारांना टार्गेट केलं, तर फडणवसींसोबतच्या भेटीची पोलखोलही केली. जानकरांनंतर फलटपणमध्येही रामराजे पवार यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तुतारी हाती घेतल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळे, माढा लोकसभा मतदारसंघ हा राजकीय चर्चेत केंद्रबिंदू राहिला आहे. शरद पवारांनी माढा लोकसभा मतदारसंघात जाहीर सभा घेऊन पंढरपुरात दर्शनही घेतलं होतं. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी माढ्यात सभा घेऊन अभिजीत पाटील यांना लोकसभा निवडणुकांसाठी सोबत घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतरही अजून नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत.
प्रसाद लाड यांनी घेतली भेट
राष्ट्रवादीचे माळशिरस विधानसभा माजी दिवंगत आमदार हनुमंत डोळस यांच्या मुलासोबत भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय असलेल्या आ. प्रसाद लाड यांची चर्चा झाली आहे. त्यामुळे, माढ्याच्या पुढील ट्विस्टमध्ये फडणवीसांच्या गळाला राष्ट्रवादीचे संकल्प डोळस लागणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. माढा लोकसभा मतदारसंघात माळशिरस मतदारसंघाचाही समावेश असून स्वर्गीय हनुमंत डोळस हे 3 वेळा होते माळशिरसचे आमदार राहिले आहेत. त्यामुळे, डोळस कुटुंबीयांना मानणारा मोठा वर्ग माळशिरसमध्ये आहे. त्यातच, येथील मागासवर्गीय समाजातील ते वजनदार नेते राहिले आहेत. त्यामुळे, दलित समाजात डोळस यांच्या शब्दाला किंमत आहे. त्यामुळे, शरद पवारांसोबत असलेलं डोळस कुटुंब भाजपाच्यासोबत गेल्यास माढा लोकसभा मतदारसंघात रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना त्याचा थेट फायदा होऊ शकतो.
जानकर व डोळस वाद
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुटल्यावरही स्व. हनुमंत डोळस यांचे चिरंजीव आणि युवक नेते संकल्प डोळस हे शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले आहेत. मात्र, मोहिते पाटील व उत्तम जानकर यांच्यातील युतीमुळे डोळस अस्वस्थ झाले आहेत. जानकर यांच्यामुळे विधानसभेला आपल्याला डावललं जाऊ शकेल, असा कयास डोळस कुटुंबीयांकडून लावला जात आहे. कारण, उत्तम जानकर यांच्या दाखल्याविरोधात संकल्प डोळस यांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. त्यामुळे, जानकर हे शरद पवारांसोबत आल्याने संकल्प डोळस यांच्या राजकीय करिअरला अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळेच, फडणवीसांनी नवा डाव टाकत संकल्प डोळस यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे, आता संकल्प डोळस काय भूमिका घेतात, याकडे माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच दिग्गजांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा