मुंबई: राज्यातील लोकसभा निवडणुकीचे दोन टप्प्यातील मतदान पार पडले तरी महायुतीमधील जागावाटप अद्याप अंतिम झालेले नाही. मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर या जागांवर अद्याप महायुतीने उमेदवारच जाहीर केलेले नाहीत. शिंदे गट आणि भाजपमध्ये (BJP) रस्सीखेच सुरु असल्याने या जागांवरील उमेदवार अद्याप ठरलेले नाहीत. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटाच्या (Shivsena Shinde Camp) कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. परंतु, आता महायुतीने (Mahayuti) हा प्रश्न निकालात काढायचा ठरवला असून येत्या 24 तासांमध्ये महायुतीचे अंतिम जागावापट जाहीर होण्याची शक्यता आहे.


सूत्रांच्या माहितीनुसार, ठाणे आणि नाशिक लोकसभा मतदारसंघ हा शिंदे गटाच्या वाट्याला आला आहे. तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरुन शिवसेनेत अद्याप रस्सीखेच सुरु आहे. परंतु, या दोन्ही जागा भाजपला मिळण्याची दाट शक्यता आहे. उमेदवारांबाबत चर्चा करायची झाली तर ठाणे लोकसभेसाठी शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांचे नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी प्रताप सरनाईक यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यादृष्टीने कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी सुरुवात केली होती.  त्यांनी पोलिसांकडून त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांच्या नोंदींचा तपशील मागवून घेतला होता. याशिवाय, राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या दक्षिण मुंबईतून लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांना उमेदवारी मिळू शकते.  या मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांच्या नावाचीही चर्चा होती. गेल्या काही दिवसांमध्ये राहुल नार्वेकर यांनी दक्षिण मुंबई पिंजून काढली आहे. परंतु, आता शेवटच्या क्षणी मंगलप्रभात लोढा बाजी मारण्याची शक्यता आहे. तर प्रचंड राजकीय उलथापालथ सुरु असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. 


सुरुवातीच्या काळात नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांचे नाव चर्चेत होते. यानंतर अजय बोरस्ते यांचे नाव पुढे आले. मात्र, आता गेल्या काही तासांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या नावाचीही नाशिकसाठी जोरदार चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये नाशिक लोकसभेची उमेदवारी कोणाला मिळणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 


हेमंत गोडसेंकडून देवदर्शनाचा धडाका


नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळावी यासाठी मुंबईवारी करणाऱ्या खासदार हेमंत गोडसे यांचा देवदर्शनाचा धडका  सुरूच आहे. अयोध्येतील राम मंदिर पाठोपाठ हेमंत गोडसे यांनी तुळजापूरला जाऊन भवानी मातेचे दर्शन घेतले. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी पहिल्याच दिवशी हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतला आहे. तोच अर्ज देवीच्या चरणावर ठेऊन हेमंत गोडसे यांनी भवानी मातेचे दर्शन घेतले. तिकीट मिळविण्यासाठी दोन महिन्यांपासून संघर्ष करणाऱ्या हेमंत गोडसेना भवानी माता पावणार का, याकडे लक्ष लागले आहे. 


आणखी वाचा


शांतीगिरी महाराजांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, नाशिक लोकसभेतून अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात