मुंबई : केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी सांगितलं आणि आपण जीन्स घालायची सोडून दिली, एकापेक्षा जास्त खिसे असलेले शर्ट घालायचे सोडून दिले आणि खादीचे कपडे वापरायला सुरू केल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार  (Ashish Shelar BJP)यांनी सांगितलं. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना आपल्यावर पाळत ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच संजय राऊत हे आपले आवडते विरोधक असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. 


एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा (Tondi Pariksha ABP Majha) या खास कार्यक्रमात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार हे पाहुणे म्हणून आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या वैविध्यपूर्ण तोंडी परीक्षेचा हा कार्यक्रम नेहमी इतकाच रंगला. 


आवडता विरोधक कोण? 


एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत आशिष शेलार यांना त्यांचा आवडता विरोधक कोण असा प्रश्न विचारण्यात आला. त्यासाठी त्यांना पर्यायही देण्यात आले होते. पण शेलारांनी आवडता विरोधक म्हणून चक्क संजय राऊतांचं नाव घेऊन प्रेक्षकांना धक्का दिला. त्यानंतर संजय राऊत का आवडतात हे सांगताना त्यांनी आपली राजकीय चतुराईची झलक दिली. 


संजय राऊत जे बोलतात त्यामुळे आपला कार्यकर्ता पेटून उठतो त्यामुळे राऊत आपले आवडते विरोधक असल्याचं आशिष शेलार म्हणाले. 


महाविकास आघाडीच्या काळात आमच्यावर पाळत


महाविकास आघाडी सरकारच्या काळात काही भाजप नेत्यांना अटक होणार होती, असा आरोप भाजपच्या विविध नेत्यांकडून सातत्यानं होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर एक खळबळजनक आरोप केला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात आम्हा भाजप नेत्यांवर  24 तास पोलिसांची, त्यांच्या खबरींची पाळत होती असा आरोप आशिष शेलार यांनी केला.


आशिष शेलार म्हणाले की, "त्या काळात ज्या बातम्या समोर आल्या त्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या. आम्ही कुठे जातोय, कुठे बसतोय यावर पाळत होती. संविधानाचं राज्य असल्याचं सांगायचं आणि अशा प्रकारचं काम ते करायचं. उद्धव ठाकरेंनी तसं करायला नको पाहिजे होतं."


एकनाथ खडसे भाजपमध्ये यावेसे वाटतात


भाजपमधल्या वाढत्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षातला आणखी कोणता नेता लवकरात लवकर भाजपमध्ये यावा असं वाटतं असा प्रश्न आशिष शेलार यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांना जयंत पाटील, संजय निरुपम आणि एकनाथ खडसे असे पर्याय देण्यात आले होते. त्यावर त्यांनी एकनाथ खडसे असं उत्तर दिलं. 


एकनाथ खडसे यांनी लवकरात लवकर भाजपमध्ये यावेत असं आशिष शेलार यांनी सांगितलं. केंद्रातील नेते, देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं बोलणं सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. 


ही बातमी वाचा: