बारामती: शरद पवार यांनी  1978 साली महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोद सरकार स्थापन केले होते, त्याला संस्कार म्हणायचे आणि आता अजितदादांनी वेगळं जाऊन जे केलं त्याला गद्दारी म्हटले जाते. पण शरद पवार (Sharad Pawar) यांनीच 2017 मध्ये शिवसेनेला (Shivsena) एकटं पाडण्यासाठी दिल्लीत कोणाच्या घरी आणि कधी बैठक घेतली होती, याचा सर्व तपशील माझ्याकडे पुराव्यासहित उपलब्ध असल्याचे वक्तव्य अजितदादा गटाचे आमदार धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी केला. बारामती लोकसभा मतदारसंघातील पुरंदर येथे राष्ट्रवादी युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धनंजय मुंडे यांनी भुतकाळ उकरुन काढत थेट शरद पवार यांना लक्ष्य केले.


राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुलोद सरकार स्थापन करायची वेळ का आली? त्याला संस्कार म्हणायचे. मात्र, आता अजितदादांनी जे केलं आहे, ते त्यांनी एकट्याने केलेलं नाही, आमच्यासारख्या असंख्य जणांनी एकत्र येऊन हा निर्णय घेतला. पण 2014 मध्ये बाहेरुन पाठिंबा देण्याचा निर्णय हा संस्काराचा भाग आणि आता अजितदादांनी केलं त्याला गद्दारी म्हणायचे. 2017 मध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी कुठे आणि कधी बैठक झाली, याचे व्हीडिओसहित फुटेज माझ्याकडे आहे. ही बैठक दिल्लीत कोणाच्या घरी झाली?, याचा तपशील मी सांगू शकतो. या बैठकीत शिवसेनेला कसं बाजूला काढायचं, यावर चर्चा झाली. याच्यासहित जे काय घडलं होतं, त्याला संस्कार म्हणायचे आणि आम्ही केलं त्याला गद्दारी म्हणायची, असे सांगत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

जाणत्या राजाला घर नसते. पोरं नसतात, बाळ नसतं, संबंध कुटुंब त्याचं घर असतं. रयत त्याचं घर असतं. मग रयत आणि कुटुंबापैकी एकाची निवड करायची वेळ आली तेव्हा जाणता  राजाने कुटुंब का निवडलं, असा सवालही धनजंय मुंडे यांनी विचारला.

धनंजय मुंडेंना जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर


धनंजय मुंडे यांच्या या टीकेनंतर शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. पुलोद सरकारमध्ये जनसंघ किंवा भाजप पक्ष नव्हता. पुलोद सरकारमध्ये एस.एम.जोशी यांची जनता  पार्टी होती. त्यांनीच शरद पवार यांच्यासमोर सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्यत्व सोडणारे हशू आडवाणी त्या सरकारमध्ये मंत्री होते. हा सगळा इतिहास वाचावा, उगाच काहीतरी बोलू नये, असे प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाड यांनी दिले.


आणखी वाचा


पुलोद सरकारमध्ये 17 कॅबिनेट मंत्री तर 16 राज्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री; 45 वर्षांपूर्वी शरद पवारांचे पहिले मंत्रिमंडळ असे होते...