LokSabha Election 2024 : ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबा संतापले; बारामतीतील मतदान केंद्रावरील प्रकार
Lok Sabha elections 2024 : पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानकेंद्रांवर पारंपारिक भाजपचे मतदार असलेले एक आजोबा ईव्हीएमवर (EVM) कमळाचं चिन्ह नसल्याने चांगलेच संतापलेले बघायला मिळालेय.
Baramati Loksabha Election 2024 : देशात सर्वात जास्त चर्चेत असलेल्या लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे बारामती (Baramati Loksabha Election) हा होय. पवार घराण्याचा अभेद्य किल्ला अशी बारामतीची ओळख आहे. इथे सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध सुनेत्रा पवार (Sunetra pawar) अशी लढत फक्त म्हणायला आहे. मात्र, खरी लढत ही शरद पवार विरुद्ध अजित पवार (Ajit Pawar) अशीच आहे. बारामतीकरांनी सलग तीनवेळा सुप्रिया सुळे यांना दिल्लीत पाठवलं आहे. तर आता राष्ट्रवादीमध्ये उभी फुट पडल्यानंतर या मतदारसंघात नणंद विरुद्ध भावजई असा सामना रंगतोय. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात असून यावेळी त्या राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर लढताय. त्यामुळे यंदा ईव्हीएमवर कमळाचे चिन्हं दिसत नाहीये.
मात्र, अलिकडे राज्यातील राजकीय उलथापालथ पासून अनभिज्ञ असलेल्या या सर्वसामान्य मतदारांना याची क्वचितच माहिती असते. त्यामुळे पारंपारिक भाजपचे मतदार असलेले एक आजोबा ईव्हीएमवर (EVM) कमळाचं चिन्ह नसल्याने चांगलेच संतापलेले बघायला मिळालेय. पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदानकेंद्रांवर हा प्रकार घडला असून यावेळी हे आजोबा चांगलेच संतापले होते.
ईव्हीएमवर कमळाचं चिन्ह नसल्याने आजोबा संतापले
बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस व बावधन बु., ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, मान, भुकूम, भुगाव, लवळे तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रुक, वारजे, शिवणे खडकवासला, खेड शिवापुर, बिबेवाडी (काही भाग) या शहरी भागाचा समावेश करण्यात आलेला आहे.
या भागातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदनाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागासोबत शहराशी संलग्न भागात उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत असलेल्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी आज 7 मे रोजी भरपगारी सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
मतदान केंद्रावर गोंधळ
तर दुसरीकडे उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदारांनी सकाळच्या सुमारात आपला हक्क बजावण्याला पसंती दिली आहे. अशातच आज सकाळी पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील मतदान केंद्रावर एक वयोवृद्ध आजोबा चांगलेच संतापलेले बघायाला मिळाले. मतदान केंद्रांवर आल्या नंतर त्यांनी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून मतदानासाठी गेले. मात्र त्यावेळी त्यांना ईव्हीएम मशीनवर कमळाचं चिन्ह नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी मतदान न करता उपस्थितांना जाब विचाराला आणि कमळाचं चिन्ह नसल्याने मतदान न करण्याचा निर्धार केला. या सर्वप्रकारामुळे काही वेळ मतदान केंद्रावर गोंधळ झाला. मात्र या आजोबांची समजूत काढल्या नंतर त्यांनी आपला निर्णय मागे घेत मतदान केले.
इतर महत्वाच्या बातम्या