Karuna Sharma: करुणा शर्मांचा महिला आयोगावर हल्लाबोल; म्हणाल्या, 'आयोग राजकीय व्यक्तीशी संबंधितावर कारवाई केली जात नाही'
Karuna Sharma: एखादी महिला तक्रार करण्यास गेली आणि ती तक्रार एखाद्या राजकीय व्यक्तीशी संबंधित असेल तर त्यावर कोणतीच कारवाई महिला आयोगाकडून केली जात नाही, याचीच शिकार मी देखील ठरले होते

मुंबई: राज्य महिला आयोगाच्या कामावर चहूबाजूंनी टीका होत असताना आता करुणा शर्मा यांनी देखील एबीपी माझाच्या बातमीवरून रुपाली चाकणकर आणि महिला आयोगावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार आणि कुटुंबातील सदस्यांकडून त्यांना होणाऱ्या मारहाणीच्या घटना वाढत आहेत. मात्र, राज्य महिला आयोग नेमकं काय काम करतोय हेच कळत नाही, जर एखादी महिला तक्रार करण्यास गेली आणि ती तक्रार एखाद्या राजकीय व्यक्तीशी संबंधित असेल तर त्यावर कोणतीच कारवाई महिला आयोगाकडून केली जात नाही, याचीच शिकार मी देखील ठरले होते, असे करूणा शर्मा म्हणाल्या आहेत.
महिला आयोगाच्या सदस्य नियुक्त होत नाहीत, ही तर गंभीर बाब आहेच, पण या आयोगावर जी महिला असेल ती अराजकीय असावी, कोणत्याही पक्षाशी संबंधित नसावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिलांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्रात वेगळी संस्था निर्माण करण्याची आणि कोणी नसेल तर त्या संस्थेची जबाबदारी माझ्याकडे देण्याची मागणी देखील मुंडे यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
राऊतांनी देखील अराजकीय व्यक्ती पदावर नियुक्त करण्याची मागणी
वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये समोर आलेले खुलासे, मयुरी हगवणेची तक्रार या सर्व प्रकरणावर विरोधकांनी राज्य महिला आयोगावर टीका केली होती. अतिशय शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी राज्य महिला आयोग पदावर अराजकीय व्यक्ती हवी असल्याची मागणी केली आहे. महिला आयोग राज्याचा किंवा राष्ट्रीय असेल त्या जागेवर नॉन पॉलिटिकल व्यक्ती पाहिजे. राजकारणातील सोय म्हणून कोणी त्या पदावर नेमणूक करत असेल तर महिलांना न्याय मिळणार नाही. केंद्रात आणि राज्यात राजकीय व्यक्तीच आहे. राज्य महिला आयोग म्हणजे महिला आर्थिक विकास मंडळ नाही हे घटनात्मक पद आहे. यामुळे राज्यातल्या देशातल्या महिलांवरील अत्याचाराला वाटा फुटते. आम्ही त्याला काय करतो, की नेत्याच्या जवळच्या महिलेला त्या पदावर बसवतो आणि कॅबिनेट दर्जा देतो हे चुकीचे असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
























