Jitendra Awhad On Hindi Bhasha: हिंदीची जबरदस्ती कशासाठी...?; जितेंद्र आव्हाडांनी सर्व सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
Jitendra Awhad On Hindi Bhasha: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत हिंदीची जबरदस्ती कशासाठी? आणि हिंदी भाषेबाबत केलेल्या कायद्यावर भाष्य केलं आहे.

Jitendra Awhad On Hindi Bhasha मुंबई: राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा (Hindi Bhasha) अनिवार्य करण्यात आली आहे. त्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने देखील या निर्णयाचा विरोध केला आहे. याचदरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ट्विट करत हिंदीची जबरदस्ती कशासाठी? आणि हिंदी भाषेबाबत केलेल्या कायद्यावर भाष्य केलं आहे.
दरवर्षी 14 सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येत असतो. जगभरात ज्या भाषांमध्ये जास्त प्रमाणात संवाद साधला जातो; त्यामध्ये हिंदी भाषेचाही समावेश होत असतो. मात्र, हिंदी भाषेच्या बाबतीत लोकांमध्ये असाही एक गैरसमज आहे की, हिंदी भाषेचा वापर भारतामध्ये अधिक प्रमाणात होत असल्याने हिंदी ही राष्ट्रभाषा आहे. मात्र, वास्तवात तसे नाही. अधिकृतपणे हिंदीला राष्ट्र भाषेचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामागील कारणांचा घेतलेला हा धांडोळा, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
हिंदी भाषेबाबत केलेला कायदा-
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कन्हैयालाल माणिकलाल मुन्शी आणि नरसिम्हा गोपालस्वामी अय्यंगार यांच्यावर भाषेसंबंधी कायदे बनविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये हिंदी भाषेवर प्रचंड खल झाला. अखेरीस 14 सप्टेंबर 1949 रोजी कायदा करण्यात आला. संविधानातील कलम आणि ३५१ नुसार हिंदी भाषेला राज्य भाषेचा दर्जा देण्यात आला, राष्ट्र भाषेचा नाही! पण, तेव्हापासूनच 14 सप्टेंबर हा दिवस 'हिंदी भाषा दिन' म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.
संविधान निर्मात्यांनी त्यावेळेस असेही नमूद केले होते की, हिंदी भाषेचा प्रचार - प्रसार सरकारने करावाच, शिवाय, हिंदीचा शब्दकोषही विस्तारण्यासाठी कार्य करावे. परंतु, हिंदी भाषेच्या बाबतीत सरकारने संविधानकर्त्यांच्या सूचनेप्रमाणे धोरण राबविले नाही. संविधानाच्या कलम 343 मध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, हिंदी ही राज्य भाषा असेल आणि तिची लिपी ही देवनागरी असेल. हिंदीचा सरकारी कामातील वापर हा 15 वर्षांसाठी करण्यात आला. मात्र, पंधरा वर्षानंतरही सरकारी कामकाज अधिकतर इंग्रजी भाषेतच होत आहे. कालांतराने संविधानात सुधारणा (दुरूस्ती) करून भारतातील अन्य भाषांनाही मान्यता देण्यात आली. सद्यस्थितीत देशात सर्वाधिक बोलली जाणारी ही हिंदी भाषा असून आजमितीला एकूण लोकसंख्येपैकी 43 टक्क्यांपेक्षा अधिक नागरिक हिंदी भाषेत संवाद साधतात.
*हिंदी-जबरदस्ती कश्या साठी?
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 18, 2025
*हिंदी भाषा दिन २०२३* : दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी भाषा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात येत असतो. जगभरात ज्या भाषांमध्ये जास्त प्रमाणात संवाद साधला जातो; त्यामध्ये हिंदी भाषेचाही समावेश होत असतो. मात्र, हिंदी भाषेच्या बाबतीत लोकांमध्ये…
शाळेतील हिंदी सक्तीला मनसेचा विरोध, VIDEO:
संबंधित बातमी:
Video तुमची मुलं 10-10 भाषा शिकतात, मग...; शाळेत हिंदीच्या सक्तीवरुन बच्चू कडूंचे राज ठाकरेंना सवाल?
























