Jitendra Awhad: 'बडवे असू तर मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो पण तुम्ही परत या', जितेंद्र आव्हाडांचं भावनिक आवाहन
Jitendra Awhad : आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
ठाणे : राष्ट्रवादीचे (NCP) आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला भावनिक आवाहन केलंय. तुम्ही सगळे परत या, मी आणि जयंत पाटील पक्ष सोडून जातो, असं भावनिक वक्तव्य आव्हाडांनी केलंय. आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो, असंही ते पुढे म्हणाले. शरद पवारांचं स्वागत करण्यासाठी ते ठाणे टोलनाक्याजवळ आले होते. तिथे माध्यमांशी बोेलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ठाण्यात शरद पवारांचे जोरदार स्वागत (Sharad Pawar in Thane)
शरद पवार आज येवला दौऱ्यावर निघाले आहेत. ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्याजवळ जितेंद्र आव्हाड आणि कार्यकर्त्यांकडून पवारांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. आव्हाड आणि अनेक कार्यकर्ते पवारांच्या ताफ्यात सामिल झाले आणि मग हा ताफा येवल्याकडे निघाला.
माझा अडसर असेल तर मी बाजूला व्हायला तयार : आव्हाड
आव्हाड म्हणाले, अजित पवार यांच्यासोब गेलेल्या लोकांनी परत यावं मी राजकारणातून दिसेनासा होईल. माझाच अडसर असेल तर मी बाजूला व्हायला तयार आहे. मी आणि जयंत पाटील यांना देखील राजकारणातून बाजूला घेऊन जातो. आम्ही दोघेही राजकारणातून बाजूला व्हायला तयार आहे. आम्ही जर विठ्ठलाभोवतीचे बडवे असू तर आम्हाला यापुढे काहीही नको, मी दूर कुठेतरी निघून जातो. आम्ही जर बडवे असून तर बाजूला होऊ.
निवृत्त व्हा असे म्हणणे चूक : आव्हाड
शरद पवारांनी आता निवृत्त व्हावं, असं वक्तव्य 5 तारखेच्या सभेत अजित पवारांनी केलं होतं. त्यावर देखील आज जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, शरद पवारांना 84 व्या वर्षी असं वागवता आहात हे चुकीचं आहे. त्यांना निवृत्त व्हा असं म्हणणं बरोबर नाही. ज्याप्रकारे त्यांच्याबद्दल वक्तव्य झाली ती बरोबर नाहीत, असे देखील जितेंद्र आव्हाड म्हणाले.
तुम्ही जर आधीच नीट वागला असता, तर ही वेळ आलीच नसती : आनंद परांजपे
आव्हाडांच्या या वक्तव्यावर त्यांचे माजी सहकारी आनंद परांजपे (Anand Paranpe) यांनी सडेतोड उत्तर दिलंय. तुम्ही जर आधीच नीट वागला असता, तर ही वेळ आलीच नसती, असं परांजपे म्हणाले.
हे ही वाचा :